वसई: वसई-विरार महानगरपालिका क्षेत्रात चिकन आणि मटण विक्रीच्या दुकानांची संख्या प्रचंड वाढली आहे. मात्र, अनेक विक्रेते दुकानातील टाकाऊ अवशेष (वेस्ट) कचराकुंडीत न टाकता थेट नाले किंवा रस्त्याच्या कडेला फेकून देत आहेत. यामुळे शहरात ठिकठिकाणी दुर्गंधी पसरली असून नागरिकांचे आरोग्य धोक्यात आले आहे. या गंभीर प्रश्नावर नुकत्याच झालेल्या पालिकेच्या महासभेत जोरदार चर्चा झाली असून अस्वच्छता पसरवीत आहेत त्यांच्यावर कारवाई करण्यात यावी अशी मागणी यावेळी करण्यात आली आहे.
शहराच्या मुख्य रस्त्यांपासून ते अंतर्गत गल्लीबोळांपर्यंत मांस विक्रेत्यांची संख्या बेसुमार वाढली आहे. हे विक्रेते रात्रीच्या वेळी किंवा पहाटे दुकानातील रक्ताने माखलेला कचरा, हाडे आणि इतर अवशेष प्लास्टिक पिशव्यांमध्ये भरून नाल्यात किंवा निर्जन ठिकाणी फेकून देतात. यामुळे:परिसरात प्रचंड दुर्गंधी पसरत आहे. तर दुसरीकडे भटक्या कुत्र्यांचा वावर वाढला असून ते हा कचरा रस्त्यावर ओढून आणतात त्यामुळे दुर्गंधी पसरते.
नुकताच पार पडलेल्या महासभेत ‘कचरा मुक्त शहर’ व त्यासाठी करावयाच्या उपाययोजना याबाबतचा प्रस्ताव चर्चेला आणला होता. याच दरम्यान सभागृह नेते प्रफुल्ल साने यांनी शहरात विविध ठिकाणी अस्वछता पसरविण्याचे प्रकार घडतात. विशेषतः चिकन, मटण विक्रेते मासांचे अवशेष व अन्य कचरा हा उघड्यावर व नाल्यात टाकून देतात त्यामुळे दुर्गंधी निर्माण होते. अशा कचऱ्याला पायबंद घालण्यासाठी आधी शहरात असणाऱ्या चिकन व मटण विक्रेत्यांचे सर्वेक्षण करून त्यांना परवाने दिले पाहिजे.
ज्या दुकानांकडे परवाने नाहीत, त्यांना नियमांच्या चौकटीत आणून परवाने दिले जावे, जे विक्रेते नियमांचे पालन करणार नाहीत, त्यांची दुकाने सील करता येतील.याशिवाय परवाना देतानाच संबंधित विक्रेत्याने आपला कचरा कुठे आणि कसा विल्हेवाट लावणार, याची लेखी हमी देणे बंधनकारक करावे अशी मागणी साने यांनी सभागृहात मांडली. याबाबत महापौर अजीव पाटील यांनी ही त्यांच्या या मुद्द्याला सकारात्मक प्रतिसाद देत याबाबत कार्यवाही करण्यास सुरुवात केली जाईल असे त्यांनी सांगितले.
