वसई : वसई विरार शहरात विविध प्रकारचे प्रकल्प, रस्त्यांची दुरावस्था यामुळे शहरातील प्रदूषण वाढून हवेची गुणवत्ता चांगलीच घसरली आहे. सद्यस्थितीत वसई विरारमधील हवेचा निर्देशांक २१४ वर पोहचला आहे. तर सातत्याने हवेच्या गुणवत्तेत होणाऱ्या घसरणीचा परिणाम नागरी आरोग्यावर होऊ लागला आहे.

मागील काही वर्षात वसई विरार शहरातील नागरीकरण मोठ्या प्रमाणावर वाढले आहे. वाढत्या नागरीकरणामुळे इमारतींची, विविध प्रकल्पांची विकासकामे सुरू झाली आहेत. या विकासकामांसाठी मोठ्या प्रमाणात मातीभराव व इतर बांधकाम साहित्याची रस्त्यावरून वाहतूक सुरू आहे. तर दुसरीकडे इमारतीची इतर कामे करतानासुद्धा त्यातून मोठ्या प्रमाणात धूलिकण बाहेर पडत आहेत. विशेषतः माती भराव यासह काँक्रिट मालाची वाहतूक करणाऱ्या वाहनांच्या चाकांना लागून मोठ्या प्रमाणात धूळ शहरात येत आहे. त्यामुळे धुळीचे प्रदूषण वाढू लागली आहे.

त्यातच वाहनांची वाढती संख्या, वाहतूक कोंडी आणि विविध ठिकाणच्या रस्त्यावर पडलेल्या खड्ड्यात साचलेल्या चिखलाचे धुळीत झालेले रूपांतर यामुळे वसई, नवघर, विरार, बोईसर या भागातील हवेत धूलीकणांचा प्रादुर्भाव वाढला आहे. यामुळे ऑक्टोबर महिन्यापासून शहरातील हवेचा निर्देशांक वाढत असून डिसेंबरमध्ये २१४ इतका सर्वाधिक निर्देशांक नोंदवण्यात आला आहे.

जून-जुलै महिन्यात पावसामुळे हवेच्या निर्देशांकात झालेली घट आता अतिधोकादायक पातळीवर जाऊन पोहोचली आहे. त्यामुळे वाढत्या हवेतील प्रदूषणामुळे नागरिकांचे आणि विशेषतः श्वसनाचे आजार असणारे रुग्ण, वृद्ध, लहान मुले यांचे आरोग्य धोक्यात आले आहे. प्रदूषण नियंत्रणासाठी पालिकेकडून रस्त्यावर धूळ नियंत्रण यंत्राद्वारे फवारणी, रस्त्यांची दुरुस्ती, मोठे प्रकल्प सुरू आहेत त्यांना प्रदूषण नियंत्रण संबंधित नोटिसा बजावणे अशा उपाययोजना केल्या जात असल्याचे महापालिका आयुक्तांनी सांगितले आहे.

प्रकल्पांच्या ठिकाणी नियोजन नाही

वसई-विरार शहरात सध्या मोठ्या प्रमाणात गृहनिर्माण आणि विकास प्रकल्प सुरू आहेत. मात्र, या प्रकल्पस्थळी धुळीवर नियंत्रण मिळवण्यासाठी आवश्यक उपाययोजनांची अंमलबजावणी होताना दिसत नाही. बांधकाम व्यावसायिकांना रस्त्यांवरून माती आणि बांधकाम साहित्याची वाहतूक करताना पाण्याचे फवारे मारणे, राडारोडा बंदिस्त वाहनांतून नेणे किंवा प्रकल्पस्थळी पत्र्यांचे कुंपण बसवणे यांसारखे नियम घालून दिलेले आहेत. मात्र, हे नियम सर्रास पायदळी तुडविले जात असल्यामुळे वायु प्रदूषणात वाढ होत असल्याचे नागरिकांनी सांगितले आहे.

कचरा जाळ्यामुळे प्रदूषणात वाढ

वसई विरार शहरात वाढत्या लोकसंख्येमुळे कचऱ्याची समस्याही गंभीर बनली आहे. कंत्राटदाराकडून योग्यवेळी कचरा उचलला जात नसल्यामुळे शहरात कचऱ्याचे ढीग तयार होऊ लागले आहेत. तर साचलेल्या कचऱ्याची विल्हेवाट लावण्यासाठी कचरा जाळण्याच्या, पेटवण्याच्या घटना समोर येत आहेत. यामुळे शहरातील धुराचे प्रमाण वाढून नागरिकांच्या आरोग्याचा प्रश्न निर्माण झाला आहे.

प्रदूषण रोखण्यासाठी उपाययोजना काय?

वसई विरार शहरातील वायू प्रदूषणावर नियंत्रण मिळवण्यासाठी विविध उपाययोजनांची गरज आहे. वाढत्या प्रदूषणावर नियंत्रण मिळवण्यासाठी, शहरातील धूळ प्रदूषण वाढीस कारणीभूत ठरणाऱ्या बांधकाम प्रकल्पांवर कारवाई करणे, उघडपणे होणाऱ्या माती आणि राडारोड्याची वाहतुकीवर प्रतिबंध घालणे, रस्त्याच्या कडेला तसेच प्रकल्पस्थळी पाण्याची फवारणी करणे, कचरा तसेच इतर साहित्य जाळून प्रदूषण करणाऱ्यांवर कारवाई करणे, शहरातील प्रदूषण नियंत्रण यंत्रणा सुसज्ज करणे, नागरिकांना सार्वजनिक वाहतुकीचा वापर करण्यास किंवा पर्यावरणपूरक वाहतुकीचा वापर करण्यास प्रोत्साहित करणे, जनजागृतीपर कार्यक्रमांचे आयोजन करणे, अशा उपाययोजना राबविणे गरजेचे असल्याचे मत पर्यावरण प्रेमींनी व्यक्त केले आहे.