विरार – वसई विरार शहरात वाढत्या वायू प्रदूषणाची चर्चा होत असताना, समीर ॲपवरील नोंदीनुसार फेब्रुवारी महिन्यात शहरातील हवेच्या गुणवत्तेत कमालीचा चढ उतार पाहायला मिळाला आहे. या महिन्यातील आकडेवारीनुसार महिन्यातील पहिल्या पंधरा दिवसात हवेची गुणवत्ता ‘मध्यम’ स्वरूपाची होती. तर महिन्याच्या उत्तरार्धात हवेची गुणवत्ता ‘समाधानकारक’ श्रेणीत नोंदवण्यात आली आहे.

वसई विरार शहरात जागोजागी सुरू असणारे बांधकाम प्रकल्प, जलवाहिन्यांसाठी सुरू असणारे खोदकाम, रस्ते दुरुस्ती, पुलांचे बांधकाम, खाजगी वाहनांची वाढती संख्या यामुळे गेल्या काही महिन्यांपासून शहरातील हवेची गुणवत्ता सातत्याने घसरत असून मध्यम श्रेणीत नोंदवली जात होती. तर फेब्रुवारी महिन्यातही हवेतील निर्देशांकात मोठा चढ-उतार पाहायला मिळाला.

समीर ॲपवरील नोंदीनुसार फेब्रुवारी महिन्याच्या सुरुवातीला शहरातील हवेची गुणवत्ता ‘मध्यम’ स्वरूपाची होती. १ ते १५ फेब्रुवारी या पंधरा दिवसांच्या कालावधीत हवेचा निर्देशांक १०० ते १५० च्या दरम्यान नोंदवण्यात आल्याने हवेत प्रदूषकांचे प्रमाण अधिक दिसून आले. तर ९ फेब्रुवारी रोजी हवेचा निर्देशांक १४८ आणि १३ फेब्रुवारी रोजी हवेचा निर्देशांक १४७ इतका नोंदवण्यात आला असल्यामुळे या दोन्ही दिवशी हवेची गुणवत्ता सर्वाधिक खालावल्याचे पाहायला मिळाले. तसेच या काळात वातावरणात पीएम २.५ आणि पीएम १० या धूलिकणांचे प्रमाणही हवेत अधिक होते.

पण, महिन्याच्या दुसऱ्या पंधरवड्यात मात्र शहरातील हवेचा दर्जा काहीसा सुधारलेला पाहायला मिळाला. १६ फेब्रुवारी रोजी हवेच्या गुणवत्ते सुधार होऊन निर्देशांक १०० च्या खाली आला. तर १८ फेब्रुवारीला हाच निर्देशांक ३६ इतका नोंदवण्यात आला. जो या संपूर्ण महिन्यातील नीचांकी आणि ‘उत्तम’ दर्जाचा निर्देशांक ठरला. त्यानंतर १९ फेब्रुवारीलाही निर्देशांक ४८ या समाधानकारक श्रेणीत नोंदवण्यात आला.

फेब्रुवारी महिन्यातील हवेचा दर्जा:

सर्वात प्रदूषित दिवस: ९ फेब्रुवारी (१४८).
सर्वात स्वच्छ दिवस: १८ फेब्रुवारी (३६).
मुख्य प्रदूषक: पीएम २.५ आणि पीएम १०
सद्यस्थिती: २६ फेब्रुवारीला (८५) समाधानकारक