वसई: वसई विरार शहरात सार्वजनिक वाहतुकीचा मुख्य कणा मानल्या जाणाऱ्या ऑटोरिक्षांची संख्या ही आता नियंत्रणाच्या बाहेर जाताना दिसून येत आहे. आता जरी रिक्षा परवान्यांना स्थगिती देण्यात आली असली तरी वर्षभरात शहरात १ हजार ३०७ रिक्षांचे परवान्याचे वितरण प्रादेशिक परिवहन विभागाकडून करण्यात आले आहे.
वसई विरार शहर हे झपाट्याने विकसित होत आहे. त्यासोबत लोकसंख्या व वाहनांची संख्या वेगाने वाढू लागली आहे. परवाने खुले झाल्यानंतर रिक्षा परवाने काढून नवीन रिक्षा खरेदी करण्याचे प्रमाण सर्वाधित झाले आहे.त्यासाठी लागणारे परवाने काढून घेण्यासाठी नागरिक प्रादेशिक परिवहन विभागाच्या कार्यालयात येत असतात.
२०२५- २०२६ या वर्षात १३०७ इतके परवाने वितरित करण्यात आले असल्याची माहिती परिवहन विभागाने दिली आहे.त्यामुळेशहरात दिवसेंदिवस रिक्षांची संख्या वाढत असल्याचे चित्र दिसून येत आहे. वसई, नालासोपारा, नायगाव, महामार्ग, विरार अशा सर्वच ठिकाणी मोठ्या प्रमाणात रिक्षा धावताना दिसून येत आहेत.
शहरात रिक्षांची संख्या वाढत असली तरी शहरातील रस्तेही अपुरे पडू लागले आहेत. याचा परिणाम हा वाहतुकीवर होऊ लागला आहे. त्यातच काही बेशिस्त रिक्षा चालक हे उलट सुलट रिक्षा उभी करीत असल्याने वाहतुकीची समस्या निर्माण होत आहे. विशेषतः स्थानक परिसरात अशा प्रकारे रिक्षा उभ्या केल्या जात आहेत.
त्यामुळे नागरिकांना ही या रिक्षांचा गराड्यातून वाट काढत बाहेर पडावे लागत असल्याचे चित्र वाढत आहे. अशा बेशिस्त रिक्षा पार्किंगवर कारवाई करण्यात यावी अशी मागणी केली जात आहे. याशिवाय शहरातील भागाचे सर्वेक्षण करून नवीन रिक्षा थांब्यांची निर्मिती करण्यात यावी अशी मागणी ही नागरिक करीत आहे.
रिक्षा परवाने स्थगित
यापूर्वी शासनाच्या धोरणानुसार आणि निकषांची पूर्तता करणाऱ्या अर्जदारांना परवाने देण्यात आले आहेत. मात्र महाराष्ट्र सरकारने वाढत्या वाहतूक कोंडीमुळे ९ मार्च २०२६ पासून नवीन रिक्षा परवाने देण्यास तात्पुरता स्थगिती देण्यात आली आहे. अशी माहिती परिवहन विभागाकडून देण्यात आली आहे.
सीएनजी सुविधा अपुरी
वाढत्या इंधन दरवाढीमुळे अनेक जण आता सीएनजी वर चालणाऱ्या रिक्षा खरेदी करत आहेत मात्र त्यासाठी लागणाऱ्या सीएनजी गॅस सुविधा अपुऱ्या आहेत. वसई विरार मध्ये केवळ चार ते पाच ठिकाणी सुविधा आहे. तेथेही मोठ्या रांगा लावाव्या लागत आहेत. त्यामुळे अनेकजण महामार्गावरून फाऊंटन किंवा मग घोडबंदर अशा ठिकाणी जातात.
