वसई: आगा खान एजन्सी फाॅर हॅबिटॅटच्या माध्यमातून गेल्या दोन वर्षात वसई विरारमधील ७२१ बावखलांचे नकाशांकन पूर्ण करण्यात आले आहे. यापैकी सर्वाधिक बावखले ही पश्चिम किनारी पट्ट्यात आढळून आली आहेत. तर आगामी काळात शहरात निर्माण होणारी पाण्याची टंचाई रोखण्याच्या दृष्टीने या बावखलांचे संवर्धन करणे अतिशय महत्त्वाचे असल्याचे फाउंडेशनच्या अभ्यासात नमूद करण्यात आले आहे.
वसई विरारमधील पारंपरिक शेती, पाणीसाठा आणि संपूर्ण परिसंस्थेचा पाया हा येथील बावखलांवर अवलंबून आहे. पोर्तुगीज काळापासून बावखलांचा वापर हा शेती, मासेमारी व भूजलाच्या पुनर्भरणासाठी केला जात आहे. मात्र, बावखलांचा वापर तिथपर्यंतच शिल्लक न राहता पुढे सांस्कृतिक व धार्मिक कार्यात त्यांचा सहभाग करण्यात आल्याने बावखले वसईच्या संस्कृतीचा एक अविभाज्य भाग बनली.
मात्र, गेल्या काही काळात वसई विरार शहराचे झालेले नागरीकरण, जागोजागी उभ्या राहणाऱ्या इमारती व शेतीक्षेत्रात झालेली घट यामुळे दैनंदिन जीवनातील बावखलांचा वापर अगदीच नगण्य झाला आहे. त्यामुळे शहरातील काही बावखले स्वच्छतेअभावी कचऱ्याने भरली आहेत. तर बावखले बुजवून त्या जागा विकासकांना विकल्या जात आहेत. मात्र, यामुळे आगामी काळात वसई विरारमधील नागरिकांना पाणीटंचाई, पूरपरिस्थिती अशा विविध समस्यांना सामोरे जावे लागू शकते. त्यामुळे शहरातील पर्यावरण प्रेमी संस्था व पर्यावरणप्रेमींकडून बावखलांच्या संवर्धनासाठी प्रयत्न केले जात आहेत.
याच पार्श्वभूमीवर आगा खान एजन्सी फाॅर हॅबिटॅटने वसई विरारमधील बावखलांचे नकाशांकन करण्याचे काम हाती घेतले होते. याबाबतची माहिती गिरीश येथील जीवनदर्शन केंद्र येथे रविवारी पार पडलेल्या चर्चासत्रादरम्यान देण्यात आली. फाउंडेशनकडून देण्यात आलेला माहितीनुसार, गेल्या दोन वर्षात शहरातील ७२१ बावखलांचे नकाशांकन पूर्ण करण्यात आले आहे. यापैकी बहुतांश बावखले ही पश्चिम किनारी पट्ट्यातील म्हणजे विरारमधील आगाशी ते वसईतील सांडोर या परिसरात आढळून आली आहेत.
मात्र, देखभाल दुरुस्ती अभावी तसेच मागील काही वर्षात बावखलांचा घटलेला वापर यामुळे ती दुर्लक्षित अवस्थेत आहेत. तसेच शहरातील ३२% विकास प्रकल्प हे बावखलांच्याजवळ उभारले जात असल्यामुळे त्यांना धोका निर्माण झाल्याचे अहवालात नमूद करण्यात आले आहे. तसेच यामुळे पावसाचे पाणी जमिनीत मुरण्याऐवजी वाहून जाते, परिणामी पावसाळ्यात पूरस्थिती आणि उन्हाळ्यात तीव्र पाणीटंचाई निर्माण होत आहे. जर या बावखलांच्या संवर्धनाकडे दुर्लक्ष केले आणि योग्य पावले उचलली नाहीत, तर येत्या ५ ते १० वर्षांत या भागातील भूजल साठा पूर्णपणे नष्ट होण्याची भीती व्यक्त करण्यात आली आहे.
यामुळे बावखलांबाबत जनजागृती करणे, त्यांचा पुनर्वापर करणे, सद्यस्थिती बावखलांमध्ये सोडले जाणारे सांडपाणी व तसेच प्लास्टिकमुळे होणारे प्रदूषण रोखणे आणि महत्त्वाचा भाग म्हणजे यासाठी स्थानिक रहिवाशांनी पुढाकार घेणे आवश्यक असल्याचे पाणी अभ्यासक सचिन मर्ती यांनी स्पष्ट केले आहे.
चार वर्षात २२ बावखले बुजवली
वसईतील बावखलांचा घटलेला वापर आणि चहूबाजूंनी होणारे काँक्रीटीकरण त्यांच्यासाठी धोका ठरू लागले आहे. गेल्या चार वर्षात विविध कारणांसाठी जवळपास २२ बावखले बुजवली गेली असल्याची माहितीही पाणी अभ्यासक सचिन मर्ती यांनी दिली.
संवर्धनात कायदेशीर नोंदणीचा अडथळा
वसई विरार शहरातील बहुतांश बावखलांचे नकाशंकन पूर्ण झाले असले तरी दस्तऐवजांमध्ये बावखल असा स्पष्ट उल्लेख केलेला आढळून येत नाही. तसेच एका बावखलाची मालकी अनेकांच्या नावे असल्याने या बाबी बावखलांच्या संवर्धनात अडथळात ठरत आहेत. त्यामुळे यासाठी विशेष नियम किंवा कायदा करण्याची गरज पर्यावरण प्रेमींनी व्यक्त केले आहे.
बावखलांची यादी:
१. आगाशी: १९
२. अर्नाळा: १
३. भुईगाव: ४९
४. बोळींज: १०
५. गास: ५०
६. गिरिज: ३८
७. गोम्सआळी: २५
८. ज्योती: ७
९. माणिकपूर: ०
१०. मर्देस: ३१
११. मर्सिस: २१
१२. मूळगाव: २५
१३. नारिंगी: १६
१४. नाळा: १
१५. नाळेभाट: ४७
१६. नंदाखाल: ५९
१७. निर्मळ: १५
१८. पाली: २२
१९. पापडी: ८९
२०. राजोडी: ०
२१. रानगाव: १
२२. रमेदी: ५१
२३. सत्पाळा: ५
२४. सांडोर: १२०
२५. शिरगाव: ९
२६. उमराळे: ११
एकूण बावखले: ७२१
