वसई: मार्गशीर्ष महिन्यात घरोघरी महालक्ष्मी व्रत केले जाते. येत्या गुरुवारी या व्रताला सुरुवात होणार असून विविध प्रकारचे सजवलेले देवीचे मुखवटे, भरजरी वस्त्र, नाजूक आणि आकर्षक घडवणीचे दागिने, पूजेच्या साहित्याने बाजार नटला आहे.

हिंदू संस्कृतीमध्ये मार्गशीर्ष महिन्यात घरोघरी महालक्ष्मीचे व्रत केले जाते. धनसंपत्ती, सुख-समृद्धी नांदावी यासाठी महिला मार्गशीर्ष महिन्यातील दर गुरुवारी महालक्ष्मीची स्थापना करून उपवास केला जातो. विशेषतः हे व्रत महिला आणि मुली करत असतात. यंदा या व्रताला गुरुवार २७ नोव्हेंबरपासून सुरुवात होत आहे. पूर्वी अत्यंत साधेपणाने होणाऱ्या या व्रताच्या भव्यतेचा साज दरवर्षी वाढत असल्याचे पहायला मिळते. त्यामुळे सुबक, आकर्षक आणि विविध प्रकारच्या मुखवट्यांची मागणी दरवर्षी वाढत असल्याचे विक्रेत्यांनी सांगितले आहे.

वसई-विरारच्या बाजारात यंदा फायबर आणि प्लास्टिकचे मुखवटे विक्रीसाठी ठेवण्यात आले आहेत. या मुखवट्यांच्या किंमती १५० रुपयांपासून १५०० रुपयांपर्यंत आहेत. प्लास्टिकचे लहान मुखवटे १५० ते २५० रुपयांना विकले जात आहेत, तर हिरे-मोत्यांनी सजवलेल्या फायबरच्या मध्यम आकाराच्या मुखवट्यांची किंमत ५०० ते १५०० रुपयांपर्यंत आहे. यात वैष्णोदेवी, कोल्हापूरची अंबाबाई, मुंबादेवी आणि एकविरा देवीचे मुखवटे यांचा समावेश आहे. तर यापैकी सोनेरी रंगाच्या एकविरा देवीच्या मुखवट्याला महिलांकडून मोठी मागणी असल्याचे विक्रेत्यांनी सांगितले.

मुखवट्यांव्यतिरिक्त डोळे, नथ आणि कुंकू असलेले मुखवट्याचे स्टिकरही बाजारात आले आहेत. तसेच, गौरी-गणपतीच्या वेळी तयार केल्या जाणाऱ्या कापडी गौरीही विक्रेत्यांकडे दिसत आहेत.

वस्त्रे आणि दागिन्यांची रेलचेल

महालक्ष्मीला सजवण्यासाठी यंदा खण, पैठणी, कोल्हापुरी, अशी विविध प्रकारची आकर्षक वस्त्र १५० रुपयांपासून उपलब्ध झाली आहेत. तर मोहनमाळ, मंगळसूत्र, कोल्हापुरी साज, लक्ष्मीहार, कुडी, चपलाहार असे नाजूक आणि आकर्षक घडवणीचे दागिने ५० ते ७०० रुपयांपर्यंत उपलब्ध आहेत.

तयार घटांना महिलांची पसंती

अलीकडच्या काळात नोकरदार महिलांना महालक्ष्मी व्रत करताना दररोजच्या घाईगडबडीत घट सजविण्यासाठी पुरेसा वेळ मिळत नाही. त्यामुळे वसई-विरार शहरात हर्षद पाटील या मुखवटा विक्रेत्याकडे मिळणारे तयार घट महिलांच्या पसंतीस उतरत आहेत. नारळावर देवीचा मुखवटा लावून, वस्त्र नेसवून आणि दागिन्यांनी नटवून १००० रुपयांपासून महिलांना हे घट सजवून दिले जातात.