वसई: धुळवडीच्या निमित्ताने अनेक जण समुद्र किनारी मोठी गर्दी करतात. तर काही अतिउत्साही पर्यटक समुद्रातही उतरतात त्यामुळे दुर्घटना घडतात अशा घटना टाळण्यासाठी होळी आणि धुलीवंदन उत्सवाच्या पार्श्वभूमीवर वसई पोलिसांनी कडक पावले उचलली आहेत. वसईतील समुद्रकिनाऱ्यावर जाण्यास बंदी घालण्यात आली असून त्या ठिकाणी कडेकोट बंदोबस्त ठेवण्यात आला आहे.

वसई विरार पश्चिमेच्या भागात अर्नाळा, भुईगाव, रानगाव, कळंब, राजोडी, सुरुची असे समुद्र किनारे आहेत. हे किनारे पर्यटनासाठी प्रसिद्ध आहेत. विशेषतः होळी आणि धुलीवंदनाच्या दिवशी पर्यटकांची मोठ्या प्रमाणात गर्दी समुद्र किनाऱ्यावर होत असते. काही पर्यटक मद्यधुंद अवस्थेत या समुद्र किनाऱ्यावर येत असतात. त्यामुळे हाणामारी, समुद्रात बुडण्याच्या घटना ही समोर येत असतात.

अशा घटना रोखण्यासाठी पोलिस प्रशासन आधीच सतर्क झाले आहे. मिरा-भाईंदर, वसई-विरार पोलीस आयुक्तालयाच्या पोलीस उपआयुक्त पौर्णिमा चौगुले-श्रींगी यांनी भारतीय नागरिक सुरक्षा संहिता २०२३ चे कलम १६३ (१) (२) अन्वये संपूर्ण वसई परिमंडळ-२ क्षेत्रात प्रतिबंधात्मक आदेश जारी केले आहेत.

​हा आदेश आज ३ मार्च २०२६ रोजी मध्यरात्रीपासून ते रात्री १२ वाजेपर्यंत लागू राहणार आहेत.​सुरुची, ​रानगाव,​ब्रम्हपाडा, ​वसई किल्ला जेटी,भुईगाव अशा ठिकाणी निर्बंध घालण्यात आल्याची माहिती पोलिसांनी दिली आहे.आदेशाचे उल्लंघन करणाऱ्या व्यक्तीवर भारतीय न्याय संहिता २०२३ चे कलम २२३ प्रमाणे कायदेशीर कारवाई करण्यात येईल, असा इशारा पोलीस प्रशासनाने दिला आहे. समुद्रात होणारे अपघात टाळण्यासाठी आणि कायदा व सुव्यवस्था राखण्यासाठी नागरिकांनी सहकार्य करावे, असे आवाहन पोलीस उपआयुक्त पौर्णिमा चौगुले-श्रींगी यांनी नागरिकांना केले आहे.

​काय आहेत निर्बंध
​प्रशासनाने जाहीर केलेल्या आदेशानुसार, वरील ठिकाणांच्या २०० मीटर परिसरात खालील बाबींवर बंदी असणार आहे

जमावबंदी: ५ किंवा त्यापेक्षा जास्त व्यक्तींना एकत्र येण्यास मनाई.

पाण्यात उतरण्यास बंदी

समुद्रकिनारी मद्यपान करणे, मद्यधुंद अवस्थेत फिरणे, मद्य वाहतूक करणे किंवा उघड्यावर मद्य सेवन करणाऱ्यांवर कडक कारवाई होईल.

महिलांची छेडछाड, अश्लील हावभाव किंवा असभ्य वर्तन करणाऱ्यांवर पोलिसांची करडी नजर असेल.

सार्वजनिक ठिकाणी मोठ्या आवाजात डी.जे. (DJ) किंवा गाड्यांमधील स्पीकर वाजवण्यास बंदी आहे.

खाद्यपदार्थ, प्लास्टिकच्या बाटल्या किंवा कचरा उघड्यावर फेकल्यास दंड आकारला जाईल.

धोकादायक ठिकाणी वाहने उभी करणे किंवा बेदरकारपणे वाहन चालवण्यास मनाई आहे.