वसई : महसुल विभागाच्या अखत्यारीत येत असलेले कांदळवन क्षेत्र आता कांदळवन विभागाकडे वर्ग करण्यासाठीच्या हालचालींना वेग आला आहे. सद्यस्थितीत वसईच्या भागातील १ हजार ५३७ हेक्टर इतक्या कांदळवन क्षेत्राची पडताळणी करण्याचे काम सुरू केले आहे. त्यामुळे शासकीय आणि खाजगी असे क्षेत्र निश्चित करून पुढील वर्गीकरणाची प्रक्रिया पार पडणार आहे.
वसई विरारमध्ये खाडी किनारे, पाणथळ जागा अशा ठिकाणी मोठ्या प्रमाणात कांदळवन क्षेत्र आहे. हे कांदळवन क्षेत्र हे महसूल विभागाच्या अखत्यारीत येत आहे. कांदळवने ही पर्यावरणाच्या संरक्षणाच्या दृष्टीने अत्यंत महत्त्वाची आहेत. याशिवाय याच कांदळवन क्षेत्र व पाणथळ जागेच्या क्षेत्रात कांदळवनांमध्ये विविध प्रकारचे पशु पक्षी ही आश्रयाला येत आहेत. मात्र शहराच्या वाढत्या नागरिकाकरणामुळे कांदळवनांची कत्तल करण्याचे काम सुरू आहे. कत्तल करून अनधिकृत बांधकामे उभारणे, माती भराव टाकून वने नष्ट करणे, वाळू उपसा करणे अशा कारणामुळे कांदळवनांचा ऱ्हास होऊ लागला आहे.
आता अस्तित्वात असलेले कांदळवन क्षेत्र टिकवून ठेवण्यासाठी व पर्यावरणीय दृष्टीने त्यांचे संवर्धन व्हावे यासाठी स्वतंत्र कांदळवन विभाग तयार करण्यात आला आहे.
त्यामुळे यापूर्वी महसूल विभागाच्या अखत्यारीत जी कांदळवने येत होती ती आता कांदळवन कक्षाकडे वर्गीकृत करण्याची प्रक्रिया सुरू झाली आहे. याबाबत जिल्हास्तरावर ही बैठका पार पडत आहेत. कांदळवन विभागाने आतापर्यंत केलेल्या सर्वेक्षणानुसार वसई विरार भागात सुमारे १ हजार ५३७ हेक्टर इतके कांदळवन क्षेत्र असल्याचा अहवाल दिला आहे. त्यामुळे संपूर्ण कांदळवन क्षेत्र वर्ग करण्याआधी त्याची संपूर्ण पडताळणी करण्याचे काम सुरू असल्याची माहिती महसूल विभागाने दिली आहे.
भूमी अभिलेख विभागाकडून मोजणी
कांदळवन नकाशावर जरी दाखवत असले तरी ते खाजगी जागेत आहेत किंवा शासकीय याची पडताळणी करणे आवश्यक आहे. यासाठी वसईच्या भूमीअभिलेख विभागाकडून त्याची पुन्हा मोजणी करवून घेतली जाणार आहे. त्याचे काम सुरू आहे. जेव्हा या कांदळवन क्षेत्राची मोजणी पूर्ण होऊन अहवाल येईल त्यानुसार ते वर्ग केले जाईल असे वसईचे उपविभागीय अधिकारी शेखर घाडगे यांनी सांगितले आहे.
यापूर्वी ५०२ हेक्टरचा ताबा
कांदळवन ताब्यात घेण्यास सुरुवात केली आहे. त्यानुसार महसूल विभागाने कांदळवन विभागाला ५०२ हेक्टर इतके क्षेत्र वर्ग केले आहे. आता उर्वरित क्षेत्र आहे त्याची प्राथमिक पाहणी प्रक्रिया पूर्ण केली आहे. त्याची अंतिम प्रक्रिया पूर्ण करून ते क्षेत्र ही ताब्यात घेऊ असे कांदळवन विभागाचे वनपरिक्षेत्र अधिकारी प्रतिक मोडवान यांनी सांगितले आहे.
कत्तलखोर मोकाटच
वसई विरार शहरात भूमाफियांनी मोठ्या प्रमाणात कांदळवन वृक्षांची छाटणी करून त्यावर अतिक्रमण केले आहे. काही ठिकाणी चक्क वाहनतळ ( पार्किंग) सुद्धा उभारण्यात आले आहेत. मात्र महसूल व कांदळवन विभाग यांच्या दुर्लक्षामुळे असे कत्तल खोर मोकाट राहत असल्याची प्रतिक्रिया पर्यावरण प्रेमींनी दिली आहे.
