वसई: उन्हाचा तडाखा वाढू लागताच वसई-विरार शहर महापालिकेच्या कचराभूमीला (डम्पिंग ग्राउंड) आगी लागण्याच्या घटनांमध्ये चिंताजनक वाढ झाली आहे. गेल्या दीड वर्षांत भोयदापाडा येथील कचराभूमीला तब्बल ३५ वेळा आग लागल्याची नोंद झाली आहे. या आगींमुळे पसरणाऱ्या विषारी धुरामुळे परिसरात मोठ्या प्रमाणावर हवेचे प्रदूषण होत असून त्याचा त्रास नागरिकांना सहन करावा लागत आहे.
वसई पूर्वेतील भोयदापाडा येथे पालिकेची सुमारे ४० एकर जागेवर पसरलेली कचराभूमी आहे. शहरात वेगाने होणाऱ्या नागरीकरणामुळे दररोज तब्बल १२०० मेट्रिक टनांपेक्षा जास्त कचरा गोळा होतो. गेल्या १५ वर्षांत कचऱ्याची योग्य विल्हेवाट न लावल्याने येथे कचऱ्याचे भलेमोठे डोंगर तयार झाले होते. विलंबानंतर पालिकेने येथे ‘बायोमायनिंग’ प्रकल्प सुरू केला खरा, परंतु कंत्राटदाराचा हलगर्जीपणा आणि दिरंगाईमुळे ही प्रक्रिया पूर्णपणे ठप्प पडली आहे. परिणामी, डम्पिंग ग्राउंडवर कचऱ्याचे ढिगारे दिवसेंदिवस साचतच आहेत.
साचलेल्या कचऱ्यात मिथेन आणि इतर रासायनिक वायू तयार होऊन अचानक आगी भडकत आहेत. अग्निशमन दलाच्या जवानांनी आतापर्यंत या आगींवर नियंत्रण मिळवले असले, तरी अनेकदा ही आग आतल्या आत धुमसत राहते. त्यामुळे परिसरात २४ तास विषारी धुराचे लोट पसरलेले असतात असे येथील नागरिकांनी सांगितले आहे. पावसाळ्यात त्यातून निघणारे घाण पाणी तर उन्हाळा सुरू होताच आगीचा धूर अशा दुहेरी मार्गाने येथील राहिवासीयांची कोंडी होत असल्याची प्रतिक्रिया येथील नागरिकांनी दिली आहे.
पालिकेकडे उपाययोजनांची मागणी
या धूर आणि प्रदूषणामुळे आसपासच्या परिसरातील रहिवाशांच्या आरोग्याचा प्रश्न गंभीर बनला आहे. श्वसनाचे विकार आणि डोळ्यांची जळजळ अशा समस्यांना नागरिकांना तोंड द्यावे लागत आहे. या लागणाऱ्या आगीचे प्रमाण कमी व्हावे यासाठी येथे कचरा विल्हेवाट प्रक्रियेवर भर देण्यात यावा अशी मागणी येथील नागरिक करीत आहेत.
दैनंदिन कचरा विल्हेवाटीसाठी निविदा प्रक्रिया सुरू
वसई विरार शहरातून दररोज बाराशे पेक्षा अधिक मेट्रिक टन कचरा गोळा होत आहे. त्या कचऱ्याची नियमितपणे प्रक्रिया होणे आवश्यक आहे. दैनंदिन निघणाऱ्या कचऱ्यावर प्रक्रिया करण्यासाठी महापालिकेकडून आता नवीन निविदा प्रक्रिया राबविली जात आहे. लवकरच त्याची प्रक्रिया पूर्ण करून बायोमाइनिंग करण्याचे काम सुरू केले जाईल असे घनकचरा व्यवस्थापन विभागाचे सहायक आयुक्त जितेंद्र नाईक यांनी सांगितले.
कचरा घोटाळा प्रकरणाचा अहवाल आयुक्तांकडे सादर
या प्रकरणात मोठा गैरव्यवहार झाल्याचा आरोप भाजप नेते किरीट सोमय्या यांनी केला होता. या संपूर्ण प्रकरणाची सखोल चौकशी करण्यासाठी विशेष समिती नियुक्त करण्याची मागणी त्यांनी महापालिका आयुक्तांकडे केली होती. त्यानुसार आयुक्तांनी अतिरिक्त आयुक्त दीपक सावंत यांच्या अध्यक्षतेखाली चौकशी समिती गठीत केली. या समितीत घनकचरा व्यवस्थापन विभागाच्या उपायुक्त अर्चना दिवे, मुख्य लेखापरीक्षक दिनकर जाधव, उपमुख्य लेखा व वित्त अधिकारी अभिजीत मेंगडे, उपमुख्य लेखापरीक्षक मनोज पवार आणि सार्वजनिक बांधकाम विभागाचे उपअभियांता सूर्यवंशी यांचा समावेश होता.
या विशेष समितीने भोयदापाडा कचराभूमीवरील व्यवस्थापनाच्या कामाची, कंत्राटाची अंमलबजावणी आणि संबंधित कागदपत्रांची सविस्तर चौकशी करून आपला अंतिम अहवाल महापालिका आयुक्तांकडे सादर केला आहे. एकीकडे आर्थिक गुन्हे शाखेकडून या प्रकरणाचा तपास सुरू असताना, दुसरीकडे महापालिकेच्या या अंतर्गत समितीच्या अहवालातून नेमकी काय माहिती समोर येते, याकडे आता सर्वांचे लक्ष लागले आहे.
