गणेशोत्सवाची कामे गैर-हिंदू ठेकेदारांना देऊ नयेत, या भाजपच्या मागणीवरून वसई-विरारमधील राजकीय वातावरण चांगलेच तापले आहे. भाजपचे गटनेते व माजी नगरसेवक अशोक शेळके यांनी केलेले हे वक्तव्य केवळ प्रसिद्धीसाठी केलेली ‘स्टंटबाजी’ असल्याचा आरोप करत बहुजन विकास आघाडी (बविआ), शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) आणि काँग्रेसने या विधानाचा तीव्र निषेध नोंदवला आहे.

गणेशोत्सव अवघ्या दोन दिवसांवर येऊन ठेपला असून महापालिका प्रशासन व सार्वजनिक मंडळांची तयारी अंतिम टप्प्यात आहे. अशा वेळी शेळके यांच्या मागणीमुळे नव्या वादाला तोंड फुटले आहे. गणेशोत्सव हा हिंदू समाजाच्या श्रद्धा, परंपरा आणि भावनांशी निगडीत महत्त्वाचा सण आहे. विसर्जनच्यावेळी मोठ्या संख्येने भाविक एकत्र येतात. त्यामुळे धार्मिक – सांस्कृतिक संवेदनशीलता व सुरक्षेच्या दृष्टीने केवळ आर्थिक बाबी न पाहता पालिकेने विसर्जनासाठी मंडप, बॅरिगेटिंग व इतर व्यवस्था उभारण्याचे काम कोणत्याही गैर हिंदू समाजातील व्यक्तीला देऊ नये. विविध राज्यातून कामानिमित्त शहरात येणाऱ्या गैर हिंदू कामगारांची पुरेशी माहिती प्रशासनाकडे नसल्याने भविष्यात कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होऊ शकतो त्यामुळे याबाबत कोणतीही तडजोड करू नये, अशी मागणी शेळके यांनी पत्राद्वारे महापालिका आयुक्तांकडे केली होती.

मात्र, त्यांच्या या मागणीविरोधात शहरातील प्रमुख राजकीय पक्षांनी आक्रमक भूमिका घेतली आहे. वसई विरारमध्ये राजकीय मतभेद असले, तरी धार्मिक मतभेद नाहीत. गेल्या अनेक वर्षांपासून सर्वधर्मीय बांधव एकत्रितपणे गणेशोत्सव साजरा करत आले आहेत. तसेच काही मुस्लिम, ख्रिस्ती बांधव मंडळांचे पदाधिकारी म्हणूनही काम पाहतात, त्यामुळे ही स्टंटबाजी वसई विरार शहरात चालणार नाही, अशी प्रतिक्रिया बहुजन विकास आघाडीचे नगरसेवक व स्थायी समिती सभापती प्रवीण शेट्टी यांनी दिले आहे.

तर दुसरीकडे शिवसेनेकडूनही (ठाकरे गट) शेळके यांच्या वक्तव्याचा निषेध नोंदवण्यात आला आहे. अवघ्या दोन ते तीन दिवसांवर गणेशोत्सव आला असताना भाजपचे नगरसेवक अशोक शेळके यांनी केलेले वक्तव्य अतिशय चुकीचे आहे. तसेच राज्यात भाजपचे सरकार असताना स्थानिक पातळीवर नगरसेवकांनी अशी मागणी करणे म्हणजे निव्वळ स्टंटबाजी असून गणेशोत्सवापूर्वी पार पडलेल्या महासभांमध्ये भाजपच्या नगरसेवकांनी हा मुद्दा का मांडला नाही, असा प्रश्न शिवसेनेचे (ठाकरे गट) जिल्हाध्यक्ष प्रथमेश राऊत यांनी उपस्थित केला आहे.

काँग्रेसची थेट गुन्हा दाखल करण्याची मागणी

भाजपचे गटनेते अशोक शेळके यांच्या वक्तव्यविरोधात वसई विरार काँग्रेस जिल्हा कमिटीकडूनही संताप व्यक्त करण्यात आला आहे. भाजप आणि राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचा शहरातील सलोखा बिघडवण्याचा हसून नियोजित प्रयत्न असून शेळके यांनी केलेले हे वक्तव्य नागरिकांच्या समानतेच्या आणि धर्मस्वातंत्र्याच्या अधिकारांवर हल्ला करणारे आहे. तसेच शेळके आणि शहरात कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण करणारे व दंगलसदृश्य वातावरण निर्माण करणारे वक्तव्य जाणून बुजून केले असल्याचा आरोपही काँग्रेसकडून करण्यात आला आहे. त्यामुळे धार्मिक तेढ निर्माण करून शहराची शांतता भंग केल्याबद्दल शेळके यांच्या विरोधात गुन्हा दाखल करावा, अशी मागणी वसई विरार जिल्हा काँग्रेस कमिटीचे जिल्हाध्यक्ष निलेश पेंढारी यांनी मिरा-भाईंदर वसई विरार पोलीस आयुक्तालयाकडे केली आहे.