वसई: वसई विरार महापालिकेच्या निवडीपूर्वीच राजकीय उलथापालथ होण्याची शक्यता वर्तवली जात आहे. भाजपाच्या तब्बल २३ नगरसेवकांनी निवडणूक लढविताना दाखल केलेल्या नामनिर्देशनपत्र पत्रात प्रचंड त्रुटी असल्याचे स्पष्ट झाले आहे. शपथपत्राचा अविभाज्य भाग असलेल्या पडताळणीवर उमेदवारांनी सह्याच केल्या नाहीत. त्यामुळे सामाजिक कार्यकर्ते यांनी न्यायालयात धाव घेत याबाबत याचिका दाखल केली आहे.
वसई विरार महापालिकेची निवडणूक नुकतीच पार पडली. या निवडणुकीत विविध राजकीय पक्षाचे व अपक्ष असे ५४७ उमेदवार निवडणुकीच्या रिंगणात उतरले होते. यात भाजपचे ९५ उमेदवारांचा समावेश होता. त्यातील ४३ उमेदवार निवडून ही आले. मात्र त्यातील काही उमेदवारांनी उमेदवारी अर्ज दाखल करताना प्रतिज्ञापत्रावर सह्याच केल्या नसल्याचा आरोप करण्यात येत आहे.
निवडणूक प्रक्रियेत नामनिर्देशनपत्र सादर करताना शपथपत्र सर्वांत महत्त्वाचे असून शपथपत्राचा अविभाज्य भाग असलेल्या पडताळणीवर उमेदवारांच्या सह्या नाहीत. पडताळणीवर अभिसाक्षी म्हणजेच उमेदवारांच्या सह्या नाहीत त्यामुळे त्यांनी केलेलं प्रतिज्ञापत्र दाखल होऊ शकत नाही. त्यामुळेच ते शपथपत्र वैध ठरत नाही. असे असतानाही निवडणूक निर्णय अधिकाऱ्याने ते नामनिर्देशनपत्र कोणत्याही हरकती शिवाय फेटाळून,बाद करणे आवश्यक होते. परंतु राज्यसरकारचे दबावामुळेच निवडणूक निर्णय अधिकाऱ्याने सदरचे नामनिर्देशनपत्र अवैध न ठरवता सदरचे अनधिकृत उमेदवार अधिकृत म्हणून निवडणुकीस पात्र ठरवले. निवडणूक आयोगाची ही भूमिका संशयास्पद असून बाबतीत ॲड. प्रविण पाटील यांनी न्यायालयात याचिका दाखल करत सदरच्या उमेदवारांचे उमेदवारी अर्जच अवैध/घटनाबाह्य असून त्या निवडून आलेल्या उमेदवारांचे सदस्यत्व रद्द करण्याची मागणी वरिष्ठ न्यायालयात केली आहे.
वसई न्यायालयात याचिका दाखल केली आहे त्यामध्ये उमेदवार, निवडणूक निर्णय अधिकारी व राज्य निवडणूक आयोगाला पक्षकार केले आहे. याबाबत उच्चन्यायालयाने २०१८ मध्ये अशाच प्रकरणामध्ये पडताळणी वर उमेदवारांची सही नसल्याचे कारणावरून त्यांचे सदस्यत्व रद्द करणारा ऐतिहासिक निर्णय दिला असल्याचे ॲड. प्रविण पाटील यांनी सांगितले आहे. आपला न्यायव्यवस्थेवर पूर्ण विश्वास असून २३ नगरसेवकांचे सदस्यत्व रद्द होईल असेही पाटील यांनी सांगितले आहे. बहुजन आघाडी विरोधात भाजपाने १६ नगरसेवक बाद करण्याबाबत न्यायालयात याचिका दाखल केलेली असताना आता भाजपच्याच तब्बल २३ नगरसेवकांवर पद रद्द होण्याची टांगती तलवार असल्याचे समोर आले आहे.
भाजपच्या या नगरसेवकांवर टांगती तलवार
१) रीना उमाकांत वाघ (२अ)
२) सान्वी(अश्रीता) संजोग यंदे (२ ब)
३) रवी श्रीगोपाळ पुरोहित (२क)
४) जितेश हरिश्चंद्र राऊत (२ ड)
५) गौरव वसंत राऊत (५ अ)
६) संजना गणेश भायदे (५ ब)
७) दर्शना अनिल त्रिपाठी (५ क)
८) मेहुल अशोक शहा (५ ड)
९) हितेश नरेंद्र जाधव (६ ड)
१०) नमिता प्रितेश पवार (११ अ)
११) जितेंद्र मनोहर पाटील (११ ब)
१२) रसिका राजेंद्र ढगे (११ क)
१३) मनोज गोपाळ पाटील (११ ड)
१४) मीरा निकम (१६ ब)
१५) बंटी तिवारी (१६ क)
१६) गणेश बाळकृष्ण पाटील (१८ अ)
१७) हेमलता सिंग (१८ ब)
१८) ख्याती संदीप घरत (१८ क)
१९) गंगेश्वरलाल श्रीवास्तव (१८ ड)
२०) अपर्णा पद्माकर पाटील (२३ अ)
२१) महेश सदाशिव सरवणकर (२३ ब)
२२) निम्मी निपुण दोषी (२३ क)
२३) प्रदीप पवार (२३ ड)

