वसई :- वसई विरार महापालिकेच्या निवडणुकीनंतर ही भाजपमधील नाराजीनाट्य काही थांबलेले नाही. बुधवारी भाजपच्या वसई विधानसभा महिला मोर्चा प्रमुख ॲड साधना धुरी यांनी कार्यकर्त्यांसह माजी आमदार हितेंद्र ठाकूर यांच्या उपस्थितीत बहुजन विकास आघाडीत प्रवेश केला आहे. त्यामुळे भाजपला पुन्हा एकदा मोठा धक्का बसला आहे.
वसई विरार महापालिकेची निवडणूक नुकताच पार पडली. या निवडणुकीत बहुजन विकास आघाडीचे ७० तर महायुतीचे ४४ नगरसेवक निवडून आले आहेत. निवडणूक काळात जागावाटप तसेच उमेदवारांची निवड अशा विविध गोष्टींमुळे भाजप कार्यकर्ते तसेच महायुतीतील मित्र पक्षांकडून भाजपवर गंभीर आरोप करण्यात आले होते तर काहींनी दुसऱ्या पक्षात प्रवेश देखील केला होता.
पण निवडणुकीचे निकाल लागल्यानंतरही भाजपमधील कार्यकर्त्यांची नाराजी कायम असल्याचे दिसून येत आहे. याच पार्श्वभूमीवर बुधवारी बहुजन विकास आघाडीच्या विरार येथील कार्यालयात भाजपच्या कार्यकर्त्यांचा पक्षप्रवेश पार पडला. यात भाजपच्या वसई विधानसभा महिला मोर्चा प्रमुख ॲड साधना धुरी आणि पेल्हार येथील पदाधिकारी फरझाना खान आणि भाजपच्या इतर कार्यकर्त्यांचा पक्षप्रवेश पार पडला. यावेळी माजी आमदार हितेंद्र ठाकूर, महापौर अजीव पाटील, माजी महापौर नारायण मानकर, नगरसेवक चंद्रशेखर धुरी उपस्थित होते.
पक्षप्रवेश झाल्यानंतर भाजप मधील नाराज पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी भाजप पक्षातील कार्यपद्धती तसेच आमदारांवर टीका केली आहे.
यावेळी बोलताना साधना धुरी यांनी सांगितले की गेल्या आठ वर्षांपासून मी भाजप पक्षात काम करीत आहे. याशिवाय माझा प्रभाग २३ आहे. त्यातही मी यापूर्वी विविध सामाजिक उपक्रम राबवून समाजहिताचे कार्य केले आहे. मात्र, निवडणुकीच्या वेळी मला प्रभाग क्रमांक २३ मध्ये उमेदवारी न देता २६ मधून उमेदवारी देण्यात आली. मात्र तेथेही मला भाजप पक्षाकडून मदत मिळाली नाही. हा जो निर्णय घेतला तो मी लोकांसाठी घेतला आहे.
वसई विरारच्या भाजपमध्ये काम सुरू आहे. ते केवळ रील तयार करण्याचे काम सुरू आहे. इथे फोटो घ्यायचे आणि नमो ॲपवर टाकायचे इतकंच काम सुरू आहे. ते मला काय जमणार नाही. आपल्याला विकास काम महत्वाचं आहे, असे साधना धुरी यांनी सांगितले.
भाजपमधील कामामुळे माझा भ्रमनिरास झाला. मनःस्ताप झाला असल्याचे ही त्यांनी स्पष्ट केले आहे. धुरी व त्यांच्या कार्यकर्त्यांनी केलेल्या पक्षप्रवेशामुळे भाजपला मोठा धक्का बसला असल्याचे मानले जात आहे.

