वसई: वसई विरार महापालिकेची तिसरी पंचवार्षिक निवडणूक अत्यंत अटीतटीची झाली. यात बहुजन विकास आघाडीने जरी  स्पष्ट बहुमताचा आकडा गाठला असला तरी दुसरीकडे भाजपने ४३ चे संख्याबळ मिळवित एक सक्षम विरोधक म्हणून स्थान पक्के केले आहे. त्यामुळे दहा वर्षांच्या कालावधी नंतर महापालिकेत विरोधीपक्ष नेता बसला. पहिल्या महासभेत भाजपचे मनोज पाटील यांची विरोधी पक्षनेता म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे.

वसई विरार महापालिकेची स्थापना २००९ साली होती. त्यानंतर २०१० मध्ये महापालिकेची पहिली सार्वत्रिक निवडणूक पार पडली.त्यावेळी ८९ जागांपैकी ६४ जागेवर बविआने जिंकून आपला महापौर बसविला होता.असे जरी असले तरी जनआंदोलन समितीने विविध राजकीय संघटना, सामाजिक संघटना यांनी एकत्रित येत निवडणूक लढवत २१ जागा जिंकल्या होत्या. सत्ता जरी मिळविता आली नसली तरी त्यांनी विरोधी बाकांवर बसण्याची संधी त्यांना मिळाली होती.

त्यावेळी २८ जून २०१० ते २८ जून २०१५ या पाच वर्षाच्या या कालावधीसाठी विनायक निकम यांनी विरोधी पक्ष नेता म्हणून कामगिरी बजावली होती.
त्यानंतर २०१५ मध्ये दुसरी महापालिका निवडणूक झाली त्यात ११५ जागांपैकी १०६ जागा जिंकल्या होत्या. तर विरोधकांना दुहेरी अंक ही गाठता आला नव्हता त्यामुळे त्या काळात विरोधी पक्ष नेता म्हणून कोणीच नव्हते. तर करोनाचे संकट, आरक्षण प्रश्न अशा विविध कारणांमुळे पाच वर्षे निवडणूक झाली नव्हती. मात्र यंदाच्या वर्षी महापालिकेची तिसरी पंचवार्षिक निवडणूक पार पडली.

ही निवडणूक अत्यंत चुरशीची ठरली. यात बविआ आणि भाजप मध्ये संघर्ष पहायला मिळाला. यात ११५ पैकी ७१ जागा जिंकत बविआने आपले वर्चस्व सिद्ध केले तर दुसरीकडे यापूर्वी केवळ एक नगरसेवक असलेल्या भाजपने ४३ चा आकडा गाठत एक सक्षम विरोधक म्हणून आपले स्थान निश्चित केले.

शुक्रवारी महापालिकेची पहिली महासभा पार पडली. या महासभेत विरोधी पक्ष नेत्यासाठी भाजपचे गटनेते अशोक शेळके यांनी मनोज पाटील यांच्या नाव सादर केले होते.

पहिल्याच महासभेत विरोधी पक्ष नेते म्हणून भाजपचे मनोज पाटील यांची निवड करण्यात आली आहे. दहा वर्षांच्या कालावधी नंतर महापालिकेत विरोधी पक्ष नेता विराजमान झाले आहेत. मनोज पाटील हे महापालिकेतील दुसरे विरोधीपक्ष नेते ठरले आहेत. यापूर्वी विनायक निकम यांनी विरोधीपक्ष नेते पद भूषविले होते.