वसई: खड्डेमय रस्ते, वाढीव मालमत्ता कर व पाणीपट्टी, तसेच भटक्या श्वानांचा वाढता उपद्रव यामुळे नागरिक त्रस्त झाले आहे. नागरिकांच्या वाढत्या समस्यांबाबत आक्रमक भूमिका घेत भाजपने महापालिका मुख्यालयावर रविवारी मोर्चा काढण्याची घोषणा केली आहे.

वसई विरार शहरातील वाढत्या नागरी समस्यांच्या पार्श्वभूमीवर गुरुवारी भाजपची पत्रकार परिषद पार पडली. या पत्रकार परिषदेत विरोधी पक्ष नेते मनोज पाटील, गटनेते अशोक शेळके, जिल्हाध्यक्ष तथा नगरसेविका प्रज्ञा पाटील, महामंत्री मनोज बारोट उपस्थित होते.

यावेळी गेल्या पाच वर्षांत रस्त्यांचे खड्डे बुजवण्यासाठी तब्बल ५४५ कोटी रुपये खर्च करण्यात आले आणि यंदाही २५ कोटी रुपयांचा निधी मंजूर झाला. मात्र, पहिल्याच पावसात रस्त्यांची चाळण झाल्याने या खर्चाच्या उपयुक्ततेवर भाजपने प्रश्नचिन्ह उपस्थित केले आहे. तसेच, करवाढ न करण्याचे आश्वासन देऊनही नागरिकांना वाढीव मालमत्ता कर व पाणीपट्टीची बिले देण्यात आल्याने तीव्र असंतोष आहे. शहरातील पाणीचोरी आणि अवैध नळजोडण्यांवर आधी कारवाई करावी, तसेच सुविधा मिळेपर्यंत हा जाचक कर रद्द करावा, अशी मागणी भाजपने केली आहे.

दुसरीकडे, शहरातील भटक्या श्वानांची संख्या १ लाखावर पोहोचली असून गेल्या पाच वर्षांत पालिकेने केवळ ३० हजार श्वानांचे निर्बिजीकरण केले आहे. पालिकेच्या या अपयशामुळे रेबीज आणि श्वानदंशाचा धोका वाढला असून निर्बिजीकरण मोहिमेला वेग देण्याची गरज भाजपने व्यक्त केली आहे. या सर्व नागरी प्रश्नांकडे पालिकेचे लक्ष वेधण्यासाठी रविवारी भव्य मोर्चा काढला जाणार असल्याचे भाजपकडून सांगण्यात आले आहे.