वसई:- वसई विरार शहरात बोगस डॉक्टरांच्या शोध मोहिमेला वेग आला आहे. गुरुवारी रात्री महापालिकेच्या वैद्यकीय आरोग्य पथकाने नालासोपारा संतोषभाव वालईपाडा भागातील ‘ऋषी हेल्थकेअर अॅण्ड क्लिनिक’वर छापा टाकत बोगस डॉक्टरवर कारवाई केली आहे.धक्कादायक बाब म्हणजे, हा बोगस डॉक्टर स्वतःची कोणतीही पदवी नसताना दुसऱ्याच एका अधिकृत डॉक्टरच्या पदवीचा गैरवापर करून रुग्णांवर उपचार करत होता.

मागील काही वर्षापासून शहरात विविध ठिकाणच्या भागात बोगस डॉक्टर आपले दवाखाने थाटू लागले आहेत. अशा बोगस डॉक्टरांना पायबंद घालण्यासाठी महापालिकेच्या वैद्यकीय आरोग्य विभागाने मोहीम हाती घेतली आहे. यासाठी पथके नियुक्त करून कारवाई सुरू आहे. याच दरम्यान नालासोपारा पूर्वेच्या वालईपाड्यातील ‘ऋषी हेल्थकेअर’मध्ये कोणतीही पदवी नसलेला व्यक्ती रुग्णांवर उपचार करत असल्याची गुप्त माहिती पालिकेच्या आरोग्य विभागाला मिळाली होती. त्यानुसार गुरुवारी रात्री ११ च्या सुमारास आरोग्य विभागाच्या पथकाने दवाखान्यात छापा टाकला रवींद्र रंजन याच्याकडे वैद्यकीय व्यवसायाचा कोणताही परवाना नव्हता. तो डॉ. सत्येंद्र पांडे यांच्या बीएचएमएस (BHMS) पदवीचा व नावाचा बेकायदेशीर वापर करून नागरिकांची फसवणूक करीत असल्याचे उघड झाले आहे.कारवाई दरम्यान क्लिनिकमधील वैद्यकीय साहित्य, उपकरणे, औषधसाठा आणि संशयास्पद कागदपत्रे पालिकेने जप्त केली आहेत.

​पदवी ‘भाड्याने’ देणारा डॉक्टरही अडकणार!

​”प्राथमिक तपासात रवींद्र रंजन हा बोगस असल्याचे सिद्ध झाले आहे. पण डॉ. सत्येंद्र पांडे यांनी आपली पदवी आणि ओळख जाणीवपूर्वक या बोगस डॉक्टरला वापरण्यास दिली. त्यामुळे या गुन्ह्यात तेवढेच भागीदार असलेल्या डॉ. पांडे यांच्यावरही गुन्हा दाखल करण्यात आला असून पोलीस पुढील तपास करत आहेत अशी माहिती महापालिकेने दिली आहे.

प्रशासनाचे नागरिकांना आवाहन

​नागरिकांच्या आरोग्याशी तडजोड करणाऱ्या अशा बोगस डॉक्टरांविरोधातील मोहीम यापुढे अधिक तीव्र केली जाईल, असा इशारा पालिकेने दिला आहे. तसेच नागरिकांनी ​परिसरात कोणताही संशयास्पद वैद्यकीय व्यवसाय किंवा बोगस डॉक्टर आढळल्यास त्याची माहिती त्वरित महापालिका किंवा पोलिसांना द्यावी असे आवाहन प्रशासनाने केले आहे.