वसई: विरार मध्ये राहणाऱ्या आपल्या बहिणीला भेटायला दुचाकी वरून निघालेल्या भावाचा भरधाव वेगाने जाणाऱ्या डंपरने दिलेल्या धडकेत मृत्यू झाला. शनिवारी दुपारी साडेबाराच्या सुमारास हा अपघात घडला. याप्रकरणी बोळींज पोलीस ठाण्यात डंपर चालकाविरोधात गुन्हा दाखल केला आहे.
सियाम गेहरू सरोज (६०) असे मृत दुचाकीस्वाराचे नाव असून ते नालासोपारा येथील बिलालपाडा परिसरात राहत होते. शनिवारी दुपारी ते पत्नीसह दुचाकीवरून( एम एच ४८ एबी १७२७) वरून विरार मध्ये राहणाऱ्या बहिणीला भेटायला निघाले होते. दुपारी साडेबाराच्या सुमारास एम. बी. इस्टेट येथील बंजारा हॉटेलजवळील चौकात त्यांच्या दुचाकीला डंपरने (एमएच ४८ डीसी ०८९) जोरदार धडक दिली. या धडकेत दुचाकीवरील सरोज दाम्पत्य डंपरच्या चाकाखाली सापडले.
यात सियाम सरोज यांच्या डोक्याला दुखापत झाल्याने त्यांचा जागीच मृत्यू झाला. तर त्यांची पत्नी गंभीर जखमी झाल्या.अपघाताची माहिती मिळताच बोळींज पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली. जखमी महिलेला तातडीने खासगी रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले आहे.
मृतदेह शवविच्छेदनासाठी पाठविण्यात आला आहे. या प्रकरणी डंपरचालक विजय कुमार यादव याला अटक करण्यात आले आहे असे बोळींज पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक प्रकाश कावळे यांनी सांगितले.
