वसई: वसई-विरार महापालिकेच्या बोळींज येथील क्रीडासंकुल व नाट्यगृहाच्या उद्घाटनाच्या श्रेयावरून शनिवारी भारतीय जनता पक्ष (भाजप) आणि बहुजन विकास आघाडी (बविआ) यांच्यात जोरदार वाद झाला. भाजपच्या दोन आमदारांसह खासदार आणि नगरसेवकांनी सकाळी क्रीडासंकुलात प्रवेश करून स्वतःहून उद्घाटन केले. त्यानंतर राजशिष्टाचाराचे उल्लंघन झाल्याचा आरोप करत भाजप पदाधिकाऱ्यांनी सुमारे सहा तास ठिय्या आंदोलन केले. त्यामुळे परिसरात तणावाचे वातावरण निर्माण झाले होते. अखेर महापौर अजीव पाटील यांनी कठोर भूमिका घेतल्यानंतर भाजपने आंदोलन मागे घेतले. त्यानंतर सायंकाळी बहुजन विकास आघाडीतर्फे क्रीडासंकुल आणि नाट्यगृहाचे अधिकृत उद्घाटन करण्यात आले.
वसई-विरार महापालिकेने विरार पश्चिमेकडील बोळींज येथे सुमारे ६९ कोटी रुपये खर्चून अद्ययावत क्रीडासंकुल उभारले आहे. या प्रकल्पाचे काम सुरू होऊन आठ वर्षे उलटली असली, तरी संकुलाचे काम अद्याप पूर्ण झालेले नसल्याचा आरोप होत आहे. दरम्यान, शनिवारी सायंकाळी बहुजन विकास आघाडीतर्फे या क्रीडासंकुल व नाट्यगृहाच्या उद्घाटनाचा कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता.
मात्र, या कार्यक्रमाच्या पत्रिकेत भाजपचे खासदार डॉ. हेमंत सवरा यांचे नाव नसल्याने भाजपने तीव्र नाराजी व्यक्त केली. हा थेट राजशिष्टाचाराचा भंग असल्याचा आरोप करत भाजपने स्वतंत्रपणे उद्घाटनाचा कार्यक्रम जाहीर केला. शनिवारी सकाळी सुमारे ११ वाजता खासदार डॉ. हेमंत सवरा, आमदार राजन नाईक आणि आमदार स्नेहा दुबे-पंडित यांच्यासह भाजपचे नगरसेवक क्रीडासंकुलात दाखल झाले. कडक पोलीस बंदोबस्त असतानाही त्यांनी संकुलात प्रवेश करून उद्घाटन उरकले. त्यानंतर सायंकाळी प्रस्तावित असलेल्या बहुजन विकास आघाडीच्या कार्यक्रमाला विरोध दर्शवत भाजपचे पदाधिकारी व नगरसेवक संकुलाच्या आवारातच ठिय्या आंदोलनाला बसले.
या वेळी भाजप आणि बहुजन विकास आघाडीचे कार्यकर्ते मोठ्या संख्येने जमा झाल्याने परिसरात तणाव वाढला. दोन्ही बाजूंनी जोरदार घोषणाबाजी सुरू झाल्याने परिस्थिती चिघळण्याची शक्यता निर्माण झाली होती. घटनेचे गांभीर्य ओळखून पोलिसांनी अतिरिक्त कुमक मागवून मोठा बंदोबस्त तैनात केला. त्यामुळे संकुल परिसराला पोलीस छावणीचे स्वरूप आले होते.
परिस्थितीवर तोडगा काढण्यासाठी दोन्ही पक्षांच्या नेत्यांची बैठक झाली. यात महापौर अजीव पाटील यांनी सर्वांनी एकत्रितपणे उद्घाटन करण्याचा प्रस्ताव मांडला. मात्र, आमदार स्नेहा दुबे-पंडित यांनी माजी आमदार क्षितिज ठाकूर यांच्या हस्ते उद्घाटन करण्यास विरोध केल्याचे समजते. यावर “उद्घाटन कोणाच्या हस्ते करायचे, हे मीच ठरवणार,” अशी ठाम भूमिका महापौर अजीव पाटील यांनी घेतली. महापौरांच्या या कठोर भूमिकेनंतर भाजपने आपले आंदोलन गुंडाळले. सुमारे सहा तास चाललेले आंदोलन मागे घेतल्यानंतर थोडक्यात उद्घाटन सोहळा आटोपून भाजपचे पदाधिकारी व नगरसेवक तेथून निघून गेले.
त्यानंतर सायंकाळी सुमारे ६.३० वाजता बहुजन विकास आघाडीतर्फे क्रीडासंकुल आणि नाट्यगृहाचे अधिकृत उद्घाटन करण्यात आले. या वेळी बोलताना माजी आमदार हितेंद्र ठाकूर यांनी भाजपवर टीका केली. श्रेय घेण्यासाठी मेहनत करावी लागते, केवळ रील्स बनवून चालत नाही,असा टोला ठाकूर यांनी या वेळी लगावला.
“सर्वांनी एकत्र येऊन उद्घाटन करावे असा प्रस्ताव मी दिला होता. मात्र, उद्घाटनाच्या नावाखाली राजकारण केले जात असेल तर ते योग्य नाही. या कार्यक्रमाची निमंत्रणपत्रिका छापलेलीच नव्हती, त्यामुळे राजशिष्टाचाराचा भंग होण्याचा प्रश्नच उद्भवत नाही. हा संपूर्ण कार्यक्रम नियमानुसारच पार पडला आहे.”- अजीव पाटील, महापौर , वसई-विरार महापालिका
