वसई: वसई विरार शहरातील विकासकांना बांधकामस्थळी एक्यूआय डिस्प्ले मॉनिटर्स लावणे बंधनकारक करण्यात आले आहे. तर या एक्यूआय डिस्प्ले मॉनिटर्सवर दिसणारी माहिती महापालिकेकडे नोंदवली जावी, यासाठी पालिकेकडून डॅशबोर्ड विकसित केला जाणार आहे.

मुंबई व मुंबई उपनगराच्या तुलनेत कमी किंमतीत घरे उपलब्ध होत असल्यामुळे व पालघर जिल्ह्यातील विविध प्रस्तावित प्रकल्प यामुळे महाराष्ट्रच नव्हे तर देशाच्या विविध भागातील लोकांचा वसई विरार शहरातील घर खरेदीकडे असणारा ओढा वाढला आहे. यामुळे शहरात मोकळ्या व मोक्याच्या भूखंडावर गगनचुंबी इमारती उभारणे, ३० ते ३५ वर्ष जुन्या इमारती तोडून त्याठिकाणी टोलेजंग इमारत उभे करणे, असे गृहप्रकल्प मोठ्या प्रमाणावर उभारले जात आहेत.

मात्र, हे प्रकल्प उभारताना प्रकल्पस्थळी पत्र्याचे उंच कुंपण उभारणे, हिरव्या जाळ्या लावणे, धूळ बाहेर जाऊ नये म्हणून पाण्याचा शिडकाव करणे, बांधकाम साहित्य वाहणाऱ्या वाहनांची चाके स्वच्छ करणे व वाहने प्लास्टिक आवरणाने झाकणे, या नियमांकडे दुर्लक्ष करून विकासांकडून इमारती उभारल्या जात होत्या. यामुळे शहरातील वायुप्रदूषणाचा प्रश्नही गंभीर बनला होता.

तसेच ऑक्टोबर ते जानेवारी या कालावधीत हवेचा दर्जा अधिकच खालावत असल्याने सप्टेंबर महिन्यात पार पडलेल्या महासभेत मुंबई उच्च न्यायालय, प्रदूषण नियंत्रण मंडळ आणि उच्च स्तरीय समिती यांच्या आदेशानुसार वसई विरार महापालिकेने वायू प्रदूषण नियंत्रणासाठी नियमांची कठोर अंमलबजावणी करण्याचा प्रस्ताव मंजूर केला.

या मंजुरीनंतर पालिकेने शहरातील सर्व विकासकांना बांधकामस्थळी एक्यूआय डिस्प्ले मॉनिटर्स लावण्याचे निर्देश दिले आहेत. त्यानुसार शहरातील बहुतांश बांधकामस्थळी हे मॉनिटर्स लावले असल्याचे दिसून येत आहे. मात्र, या उपकरणांचे कॅलिब्रेशन म्हणजे प्रमाणीकरण अजून झाले नसल्याने व या हवेची गुणवत्ता मोजणाऱ्या उपकरणांवर दर्शविणारी माहिती महापालिकेकडे नोंदवली जावी, यासाठी पालिका इंटिग्रेटेड डॅशबोर्ड तयार करणार असल्याची माहिती पर्यावरण विभागाकडून देण्यात आली आहे. तसेच यामुळे बांधकाम प्रकल्पामुळे होणाऱ्या वायू प्रदूषणावर नियंत्रण मिळवणे व या प्रक्रियेत सुसूत्रता आणणे अधिक सोपे होणार असल्याचे, उपायुक्त हर्षला राणे यांनी सांगितले आहे.