वसई:- वसई-विरार शहर महापालिकेची सार्वजनिक परिवहन सेवा कंत्राटी कर्मचाऱ्यांच्या संपामुळे सलग दुसऱ्या दिवशीही पूर्णपणे ठप्प राहिली आहे. ठेकेदाराकडून अपुरे वेतन मिळाले असल्याचा आरोप करत बस चालक व वाहकांनी शनिवारपासून अचानक ‘काम बंद’ आंदोलन पुकारले आहे. महापालिका प्रशासन आणि संबंधित ठेकेदाराने यावर अद्याप कोणताही ठोस तोडगा न काढल्यामुळे रविवारी सुद्धा शहरात एकही बस धावलेली नाही. ठेकेदार आणि कर्मचाऱ्यांमधील या अंतर्गत वादामुळे कोणताही दोष नसताना सर्वसामान्य नागरिकांना आणि नोकरदारांना वेठीस धरले जात असल्याचा आरोप नागरिकांनी केला आहे.
वसई-विरार महापालिकेमार्फत शहरात एकूण ३६ विविध मार्गांवर ही परिवहन सेवा चालवली जाते. या बस गाड्यांमधून दररोज साधारण ६० ते ६५ हजार प्रवासी प्रवास करतात.दोन दिवसांपासून परिवहन कर्मचाऱ्यांचा संप सुरू आहे.त्याचा फटका प्रवाशांना बसत आहे.१४ सप्टेंबरपासून गणेशोत्सवाला सुरुवात होत आहे.त्यामुळे संपूर्ण शहरात गणेशोत्सवाची तयारी सुरू आहे. ऐन सणासुदीच्या काळातच ही वाहतूक व्यवस्था कोलमडल्याने सणाची खरेदी, बाजारहाट आणि नातेवाईकांकडे जाणाऱ्या नागरिकांचे अतोनात हाल होत आहेत.
रिक्षाचालकांकडून या परिस्थितीचा फायदा घेत प्रवाशांची अडवणूक केली जात असून, अधिक भाडे आकारले जात आहे. वसई फाटा ते वसई पूर्व दरम्यान प्रवास करणाऱ्या राधेश्याम गुप्ता या प्रवाशाने आपली खंत व्यक्त करताना सांगितले की, “अचानक बस बंद झाल्यामुळे नाईलाजाने रिक्षाने प्रवास करावा लागत आहे. यामुळे आमचे दैनंदिन आर्थिक गणित पूर्णपणे कोलमडले आहे.” तसेच अनेक भागांत ऑटो रिक्षाही वेळेवर मिळत नसल्याने लोकांना रांगेत ताटकळत उभे राहावे लागत आहे.
या समस्येबाबत महापालिका प्रशासनाने ठेकेदाराला कर्मचाऱ्यांचे प्रश्न तत्काळ सोडवून बस सेवा सुरू करण्याचे निर्देश दिल्याचे म्हटले आहे. दुसरीकडे, ठेकेदाराने महापालिकेकडून वेळेवर देयके न मिळाल्याने ही अडचण निर्माण झाल्याचा दावा केला आहे, तर कर्मचाऱ्यांनी सणाच्या काळात पूर्ण वेतन मिळणे हा आमचा अधिकार असल्याचे ठामपणे सांगितले आहे. गणेशोत्सवासारखा महत्त्वाचा सण तोंडावर असताना प्रशासनाने यात हस्तक्षेप करून त्वरित मार्ग काढणे गरजेचे होते, अशी तीव्र संतापजनक प्रतिक्रिया सर्वसामान्य वसई-विरारकरांमधून व्यक्त होत आहे.
