वसई: वसई-विरार शहर महापालिका क्षेत्रातील अनेक बस थांब्यांची दुरवस्था झाली असून, थांब्यांवर छप्पर नसल्याने प्रवाशांना भरउन्हात उभे राहून बसची वाट पाहावी लागत आहे. वाढत्या तापमानामुळे प्रवाशांचे प्रचंड हाल होत आहेत.
गेल्या काही काळात वसई विरार शहराचे झपाट्याने नागरीकरण झाले आहे. पण असे असताना देखील शहरातील मूलभूत सुविधांचा अभाव मात्र अजूनही कायम आहे. वसई विरार महापालिकेकडून शहरात बससेवा पुरवली जाते. तर नागरिकांच्या सोयीसाठी विविध ठिकाणी बसथांबे उभारण्यात आले आहेत. पण या बसथांब्यांची निगा न राखल्यामुळे त्यांची दुरावस्था झाली आहे.
गेल्या काही दिवसांपासून वसई-विरारमध्ये तापमानाचा पारा वाढला आहे. दुपारी उन्हाच्या झळा तीव्र असतानाही प्रवाशांना रस्त्याच्या कडेला उघड्यावर उभे राहावे लागते. वसई रेल्वे स्थानक परिसर, गावराई पाडा, सातिवली आणि अंतर्गत भागातील अनेक थांब्यांवर बसची प्रतीक्षा करताना आडोसाच उपलब्ध नसल्यामुळे नागरिकांना भर उन्हात बसची वाट पाहावी लागत आहे.
परिवहन सेवेकडून नवीन बस गाड्यांची संख्या वाढवण्यावर भर दिला जात आहे. मात्र, ज्या थांब्यांवरून प्रवासी प्रवास करतात, तिथे किमान पावसापासून आणि उन्हापासून संरक्षण देणारी शेड्स उभारण्याकडे पालिकेचे दुर्लक्ष होत आहे. अनेक ठिकाणी पूर्वी असलेली शेड्स जुनी होऊन निकामी झाली आहेत, तर काही ठिकाणी केवळ खांब उरले आहेत, अशी तक्रार प्रवाशांकडून केली जात आहे.
उन्हाळ्यानंतर आता अवघ्या दोन महिन्यांवर पावसाळा येऊन ठेपला आहे. जर वेळीच या थांब्यांची दुरुस्ती केली नाही किंवा नवीन शेड्स उभारल्या नाहीत, तर पावसात भिजत बसची वाट पाहावी लागेल. त्यामुळे महापालिकेने बस थांब्यांच्या देखभाल दुरुस्तीकडे लक्ष द्यावे, अशी मागणी नागरिकांकडून केली जात आहे.
