वसई: वसई-विरार शहर महापालिकेची सार्वजनिक परिवहन सेवा कंत्राटी कर्मचाऱ्यांच्या संपामुळे सलग चार दिवसांपासून पूर्णपणे ठप्प झाली आहे. गणेशोत्सवासारख्या महत्त्वाच्या सणासुदीच्या काळात ही सेवा बंद पडल्याने सर्वसामान्य नागरिक आणि नोकरदारांची अक्षरशः फरफट होऊ लागली आहे. ठेकेदार आणि कर्मचाऱ्यांमधील अंतर्गत वाद मिटवून ही समस्या सोडवण्यात महापालिका प्रशासन सपशेल अपयशी ठरले असून, प्रशासकीय निष्क्रियतेमुळे हजारो प्रवाशांना वेठीस धरले जात असल्याचा संतप्त आरोप नागरिकांमधून केला जात आहे.
ठेकेदाराकडून अपुरे व थकीत वेतन मिळाल्याचा गंभीर आरोप करत बस चालक व वाहकांनी शनिवारपासून अचानक ‘काम बंद’ आंदोलन पुकारले आहे. मात्र, महापालिका प्रशासन आणि संबंधित ठेकेदार यांनी कोणताही तोडगा न काढल्याने सलग चौथ्या दिवशीही शहरात परिवहन सेवेची एकही बस रस्त्यावर धावली नाही.
शहरातील ३६ विविध मार्गांवर ही परिवहन सेवा पुरवली जाते. दररोज सुमारे ६० ते ६५ हजार प्रवासी या बसने प्रवास करतात; ज्यामध्ये प्रामुख्याने नोकरदार वर्गाचा समावेश आहे. ही सेवा परवडणारी असल्याने बहुतांश नागरिक प्रवासासाठी बसलाच प्रथम प्राधान्य देतात. मात्र, ऐन गणेशोत्सवात वाहतूक व्यवस्था कोलमडल्याने सणाची खरेदी आणि नातेवाईकांकडे जाणाऱ्या नागरिकांची कोंडी झाली आहे.
महापालिकेकडून वेळेवर देयके न मिळाल्याने कर्मचाऱ्यांचे वेतन देण्यात अडचण निर्माण झाल्याचा दावा ठेकेदाराकडून करण्यात आला आहे.
तर दुसरीकडे बस सेवा सुरू करण्याच्या संदर्भात ठेकेदाराला कर्मचाऱ्यांचे प्रश्न तत्काळ सोडवून बस सेवा सुरू करण्याचे निर्देश दिले आहेत असे परिवहन व्यवस्थापक धैर्यशील जाधव यांनी सांगितले आहे. मागील तीन ते चार दिवस बँका बंद होत्या त्यामुळे देयके निघाली नाहीत ती देयके सुद्धा दिली जातील असेही जाधव यांनी स्पष्ट केले आहे.
रिक्षाचालकांकडून लूट ?
बस सेवा बंद असल्याचा गैरफायदा घेत शहरातील काही ऑटो रिक्षाचालकांनी प्रवाशांची थेट लूट सुरू केली आहे.वसई रेल्वे स्थानकातून वसई गावात जाण्यासाठी नियमानुसार ३० रुपये भाडे असताना काही रिक्षाचालक सर्रास ५ रुपये जास्त मागत आहेत. जास्तीचे भाडे देण्यास नकार दिल्यास प्रवाशांना रिक्षात बसवण्यास थेट नकार दिला जात असल्याचे प्रवासी महिलेने सांगितले आहे. तर जवळच्या थांब्यांवर जाण्यास रिक्षा तयार होतात, मात्र वसई कोळीवाडा, पाचूबंदर, गिरीज आणि भुईगाव यांसारख्या दूरवरच्या भागात जाण्यासाठी रिक्षाचालक सहसा तयार होत नाहीत. संध्याकाळच्या गर्दीच्या वेळी रिक्षा मिळणे कठीण झाले आहे. यामुळे दैनंदिन प्रवाशांसह गणेशोत्सवासाठी नातेवाईकांकडे दर्शनाला येणाऱ्या पाहुण्यांची मोठी गैरसोय होत असल्याचे नागरिकांनी सांगितले आहे.
प्रवाशांविना बस थांबे ओस
वसई विरार महापालिकेच्या परिवहन विभागामार्फत चालवल्या जाणाऱ्या बसेसमधून मोठ्या संख्येने प्रवासी प्रवास करतात. यामुळे शहरातील बस थांब्यांवर नेहमीच प्रवाशांची गर्दी पाहायला मिळते, तर सणासुदीच्या काळात ही गर्दी अधिकच वाढते. मात्र ऐन गणेशोत्सवात परिवहन विभागाच्या कर्मचाऱ्यांनी संप पुकारल्यामुळे शहरातील बस थांबे ओस पडले आहेत.
