वसई: वसई विरारच्या किनारपट्टी भागात असणाऱ्या सुरूच्या झाडांना बसणारा लाटांचा तडाखा आणि किनारपट्टी भागाची होणारी धूप यामुळे सुरूच्या झाडांची पडझड होत आहे. यामुळे किनारपट्टी परिसराच्या संवर्धनाचा प्रश्न आता ऐरणीवर आला आहे.

वसई विरार शहराला विस्तीर्ण समुद्रकिनारा लाभला आहे. मोकळे रस्ते, हिरवीगार झाडी, डोंगररांगा आणि समुद्रकिनारी असणारी सुरूची झाडे हे या समुद्रकिनाऱ्यांचे मूळ आकर्षण आहे. मात्र, गेल्या काही काळात समुद्रकिनाऱ्यांच्या देखभालीकडे झालेले दुर्लक्ष, समुद्रात उभे राहणारे विविध प्रकल्प, किनारपट्टी परिसरात होणारे अतिक्रमण यामुळे हळूहळू समुद्रकिनाऱ्याची धूप होऊ लागली आहे. तर ती होऊ नये म्हणून गरजेची असणारी सुरूची झाडेही आता नष्ट होऊ लागली आहे.

भरतीच्या लाटांचा तडाखा, वादळी वारे, यामुळे गावकरी आणि पर्यावरण प्रेमींच्या माध्यमातून लावण्यात आलेली अनेक झाडे आता नष्ट झाली आहेत. यामुळे किनारी भागात पाणी शिरणे, लोकांच्या घरात पाणी शिरणे, खारट पाण्यामुळे शेतीतले पीक नष्ट होणे, अशा विविध समस्यांना नागरिकांना सामोरे जावे लागत आहे.

याबाबत बोलताना पर्यावरण प्रेमी मॅकेन्झी डाबरे म्हणाले की, पर्यावरणाच्या संदर्भामध्ये आणि करोडो झाडं लावायची या संदर्भात सरकार बोलत आहेत. पण, मुळात जी झाडं आहेत ती वाचली पाहिजेत आणि त्यांचं संवर्धन झालं पाहिजे. या संदर्भात राज्य शासन काही करत नाही आणि महानगरपालिकेकडे आपण जर पाहिलं तर महानगरपालिका वार्षिक जेवढी झाडं लावते त्यापेक्षा जास्त झाडं महानगरपालिका कापायला परवानगी देते. तसेच सध्या पर्यावरण हे फक्त कागदावर मर्यादित राहिले असून सरकार वाटच पाहत आहे की समुद्र हा परिसर कधी गिळंकृत करतो आणि त्यानंतर त्याचा वापर त्यांना मोठे कारखाने आणि बंदरांसाठी करता येईल असा आरोपही पर्यावरणप्रेमी मॅकेन्झी डाबरे यांनी केला आहे.

धूप प्रतिबंधक बंधाऱ्यांकडे दुर्लक्ष

कोकण आपत्ती सौम्यीकरण प्रकल्पांतर्गत भुईगाव, रानगाव, पाचूबंदर- लांगेबंदर, नवापूर अशा चार समुद्र किनारपट्टीच्या भागात धूपप्रतिबंधक बंधाऱ्यांची कामे मंजूर करण्यात आली आहेत. यासाठी ३० कोटी रुपयांचा निधी मंजूर करण्यात आला असून हे काम महाराष्ट्र राज्य रस्ते विकास महामंडळ यांच्या मार्फत केले जाणार आहे. मात्र, सद्यस्थितीत या कामासाठी लागणाऱ्या सीआरझेड परवानग्या व आराखडा निश्चिती अशी कामे पूर्ण न झाल्याने या बंधाऱ्यांची कामे रखडली आहे. तसेच पाठपुरावा करूनही या कामांना गती मिळत नसल्याचा आरोप, पर्यावरणप्रेमींनी केला आहे.

सुरूची झाडे महत्त्वाची का?

समुद्रकिनाऱ्यांवर सुरूची झाडे अत्यंत महत्त्वाची असतात कारण ती नैसर्गिक संरक्षक भिंत म्हणून काम करतात. वादळी वारे आणि त्सुनामीच्या लाटांचा वेग कमी करून ही झाडे किनाऱ्याची धूप थांबवतात. तसेच, समुद्राची वाळू वाऱ्यासोबत उडून मानवी वस्तीत जाण्यापासून रोखण्यासाठी आणि किनारपट्टीचे तापमान संतुलित ठेवण्यासाठी ही झाडे मोलाची भूमिका बजावतात.