वसई: वसई विरार महापालिकेकडून जणगणना २०२७ साठी नियुक्त प्रगणक व पर्यवेक्षक यांच्या पहिल्या टप्प्यातील प्रशिक्षणास सुरुवात झाली आहे. २७ एप्रिल ते ८ मे दरम्यान प्रशिक्षण दिले जाणार आहे.
देशभरात २०११ नंतर प्रथमच वर्ष २०२७ मध्ये जनगणना केली जाणार आहे. देशातील ही पहिली डिजिटल जनगणना असून एकूण दोन टप्प्यात ही प्रक्रिया पार पडणार आहे. यातील पहिल्या टप्प्याची सुरुवात मे २०२६ पासून झाली आहे. तर वसई विरार महापालिकेकडूनही जनगणना २०२७ च्या पूर्वतयारीला वसई विरार जोमाने सुरुवात झाली आहे. जनगणनेच्या पहिल्या टप्याच्या प्रशिक्षणास २७ एप्रिल पासून सुरुवात झाली असून हे प्रशिक्षण ८ मे पर्यंत सुरु राहणार आहे.
जनगणनेच्या कामासाठी वसई विरार शहरात एकूण ०१ मास्टर ट्रेनर, ९१ क्षेत्रीय प्रशिक्षक, ७१७ पर्यवेक्षक व ४२९८ प्रगणकांची नियुक्ती करण्यात आली आहे. जनगणना २०२७ साठी दिले जाणारे प्रशिक्षण तीन टप्प्यात पार पडणार असून क्षेत्रीय प्रशिक्षकांमार्फत पर्यवेक्षक व प्रगणकांना प्रशिक्षण दिले जात आहे. वसई विरार महानगरपालिकेतील नऊ प्रभाग समित्यांअंतर्गत नियुक्त शाळा व महाविद्यालयांमध्ये हे प्रशिक्षण आयोजित करण्यात आले आहे.
प्रभाग समिती डी आचोळे अंतर्गत आयोजित प्रशिक्षण शिबिरास आयुक्त पृथ्वीराज बी.पी. यांनी भेट देऊन उपस्थित पर्यवेक्षक व प्रगणकांना मार्गदर्शन दिले. तसेच प्रशिक्षणाच्या नियोजनाची पाहणीही केली. तर १ मे पासून सुरु होणाऱ्या स्वगणना प्रक्रियेत स्वगणना करून सक्रीय सहभाग घेण्यासाठी नागरिकांना प्रोत्साहन देण्याचे कामही पर्यवेक्षक, प्रगणक यांनी करावे असे आवाहनही त्यांनी केले. यावेळी अतिरिक्त आयुक्त संजय हेरवाडे, उप-आयुक्त तथा शहर जनगणना अधिकारी हर्षला राणे, प्रभाग सहाय्यक आयुक्त महेश पाटील व इतर कर्मचारी उपस्थित होते.
जनगणना २०२७ ही देशातील पहिलीच डिजिटल जनगणना असल्यामुळे संबंधित पर्यवेक्षक व प्रगणकांना योग्य व अचूक प्रशिक्षण देण्यात येत असून प्रशिक्षणादरम्यान विशेष मोबाईल ॲपचा वापर, प्रश्नावलीचे सुलभीकरण आणि डेटाची सुरक्षा या तांत्रिक बाबींवर भर दिला जात असल्याची माहिती महापालिकेकडून देण्यात आली.
वसई विरारमध्ये स्वगणनेला सुरुवात
जनगणना २०२७ एकूण दोन टप्प्यात पार पडणार असून वर्ष २०२६ मध्ये जनगणनेच्या पहिल्या टप्प्यात घरयादी गटानुसार व घरगणना माहिती संकलित केली जाणार असून, वर्ष २०२७ मध्ये दुसऱ्या टप्प्यात लोकसंख्या गणना व नागरिकांची इतर माहिती संकलित केली जाणार आहे. पहिल्या टप्प्यातील स्वगणनेसाठी ०१ मे २०२६ ते १५ मे २०२६ हा कालावधी देण्यात आला. या कालावधीत नागरिकांना स्वगणना अंतर्गत स्वतःची माहिती se.census.gov.in या संकेतस्थळावर भरता येणार आहे. स्वगणना करताना नागरिकांना एकूण ३४ प्रश्नांची उत्तरे द्यावी लागणार आहेत. यात घरांची स्थिती, कुटुंबाची माहिती तसेच कुटुंबास उपलब्ध असलेल्या सोयी यावर आधारित प्रश्नांचा समावेश असणार आहे.
