वसई: जनगणना २०२७ साठी नियुक्त प्रगणक आणि पर्यवेक्षकांसाठी वसई विरार महापालिकेकडून आयोजित प्रशिक्षण शिबिराचे दुसरे सत्र पार पडले आहेत. तर, या प्रशिक्षणास गैरहजर राहिलेल्या कर्मचाऱ्यांना पालिकेकडून नोटीसा पाठवण्यात आल्या असून त्यांच्यावर कारवाई प्रस्तावित करण्यात आली आहे.
जनगणना २०२७ अंतर्गत वसई विरार शहरात स्वगणना प्रक्रियेस सुरुवात झाली असून १ मे ते १५ मे २०२६ पर्यंत स्वगणना प्रकिया राबविण्यात येणार आहे. तर १६ मे पासून घरगणनेला सुरुवात केली जाणार आहे. यासाठी पालिकेकडून एकूण १ मास्टर ट्रेनर, ९१ क्षेत्रीय प्रशिक्षक, ७१७ पर्यवेक्षक व ४ हजार २९८ प्रगणकांची नियुक्ती करण्यात आली आहे. या कर्मचाऱ्यांसाठी २७ एप्रिल ते ८ मे, २०२६ या कालावधीत तीन सत्रांमध्ये प्रभाग समितीनिहाय शिबीरांचे आयोजन करण्यात आले आहे.
२७ एप्रिल ते २९ एप्रिल या कालावधीत प्रशिक्षणाचे पहिले सत्र, २ मे ते ५ मे या कालावधीत प्रशिक्षणाचे दुसरे सत्र पूर्ण झाले असून ६ मे ते ८ मे पर्यंत प्रशिक्षणाचे तिसरे सत्र घेण्यात येणार आहे. वसई विरार महापालिकेतील नऊ प्रभाग समित्यांअंतर्गत नियुक्त शाळा व महाविद्यालयांमध्ये हे प्रशिक्षण आयोजित करण्यात आले आहे. जनगणना २०२७ ही देशातील पहिलीच डिजिटल जनगणना असल्यामुळे पर्यवेक्षक व प्रगणकांना प्रशिक्षणादरम्यान विशेष मोबाईल ॲपचा वापर, प्रश्नावलीचे सुलभीकरण आणि डेटाची सुरक्षा या तांत्रिक बाबींसोबतच ॲपच्या माध्यमातून जनगणना कामकाजाचे प्रात्यक्षिक दाखविण्यात येत आहे.
तसेच या जनगणना प्रशिक्षणास गैरहजर राहिलेल्या कर्मचाऱ्यांना विभागामार्फत नोटीसा देण्यात आल्या असून, त्यांच्यावर विभागामार्फत कारवाई प्रस्तावित करण्यात आली असल्याची माहिती पालिकेकडून देण्यात आली आहे.
