वसई : वसई विरार शहरात परवाने खुले होताच रिक्षांच्या संख्येत प्रचंड वाढ झाली आहे. त्यातच काही रिक्षाचालक हे बेशिस्तपणे रिक्षा चालवित असल्याने विविध ठिकाणी वाहतूक कोंडीची समस्या निर्माण होऊ लागली आहे. त्याचा त्रास नागरिकांना सहन करावा लागत आहे.

सर्वसामान्य नागरिकांच्या सोयीच्या दृष्टीने खासगी प्रवासी वाहतूक करण्यासाठी राज्य परिवहन विभागाकडून ऑटोरिक्षांना मोटार वाहन कायद्यानुसार परवाने दिले जातात. २०१७ पासून ऑटोरिक्षा परवाने खुले करण्यात आले आहेत. परवाने खुले होताच शहरात रिक्षांना अक्षरशः सुळसुळाट झाला आहे.
परिवहन विभागाच्या दप्तरी सद्यस्थितीत ३४ हजार ५८२ रिक्षा धारकांना परवाने वितरण करण्यात आले आहेत. सुरवातीला शहरात केवळ ७ ते ८ हजार रिक्षा होत्या. आता रिक्षांची संख्या ही ३९ हजार ५७६ इतकी झाली आहे.

हेही वाचा – तो अपघात नव्हे तर हत्या; महामार्गावरील अपघाती मृत्यूचे गूढ उकलले

दिवसेंदिवस वाढत असलेल्या रिक्षांचा परिणाम हा शहरात दिसू लागला आहे. त्यातच काही अनधिकृत रिक्षांची भर पडत आहे. वसई, नायगाव, नालासोपारा, विरार अशा ठिकाणी स्थानकासह इतर परिसरात रिक्षांची मोठी गर्दी होऊन वाहतूक कोंडीची समस्या वाढली आहे. त्यातच काही रिक्षाचालक हे बेशिस्तपणे रिक्षा चालवित आहेत. रिक्षा रस्त्याच्या मध्येच अस्ताव्यस्त पद्धतीने उभ्या करतात. तर काहीवेळा प्रवासी घेण्याच्या नादात मध्येच रिक्षा थांबविल्या जातात यामुळे वाहतूक कोंडीची समस्या निर्माण होत असते. सातत्याने निर्माण होणारी वाहतूक कोंडी, हॉर्नचा त्रास यामुळे वाढती रिक्षांची संख्या ही शहराची डोकेदुखी ठरू लागली आहे. काही वेळा रिक्षा या थांबा सोडून मध्येच उभ्या करतात अशा वेळी रुग्णवाहिका बाहेर पडण्यास अडचणी येत असल्याचे नागरिकांनी सांगितले आहे.

अनधिकृत रिक्षांचा सुळसुळाट

वसई विरार शहरात अनधिकृत रिक्षांची संख्या ही वाढत आहे. नुकताच नालासोपाऱ्यात अनधिकृत रिक्षाचालक व परवाना धारक रिक्षा चालक अशा दोन गटात वाद झाला होता. पालिकेने नालासोपारा पूर्वेच्या भागात रिक्षा थांबा तयार केला आहे. मात्र काही रिक्षा चालक मध्येच येऊन प्रवासी उचलून घेऊन जातात यामुळे रांगेत थांबणाऱ्या रिक्षाचालकांना अडचणी येत आहेत. अनधिकृतपणे जे रिक्षा चालवित आहेत त्यांच्यावर कारवाई करावी अशी मागणी रिक्षा युनियनचे अध्यक्ष रामदास वाघमारे यांनी केली आहे.

गर्दुल्ल्या रिक्षाचालकांचे प्रमाण अधिक

शहरात रात्रीच्या सुमारास काही गर्दुल्ले रिक्षाचालक ही मोठ्या प्रमाणात रिक्षा चालवित असतात. काही वेळा रात्रीच्या वेळेस मद्यपान करून धिंगाणा घालणे, प्रवाशांना दादागिरी करणे असे प्रकारही समोर येतात. तर काही रिक्षाचालक हे गुन्हेगारी प्रवृत्तीचेही आहेत. अशा रिक्षा चालकांना आवर घालण्यासाठी परिवहन व पोलिसांनी कारवाईची मोहीम हाती घ्यावी अशी मागणी प्रवाशांनी केली आहे.

हेही वाचा – हलर्गजीपणामुळे रुग्णाचा मृत्यू; डॉक्टर विरोधात सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल

परिवहन विभागाकडून नियमांचे उल्लंघन करणाऱ्या व बोगस रिक्षा यांची तपासणी सुरूच आहे. जे दोषी आढळून येतात त्यांच्यावर कारवाई केली जात आहे. – अतुल आदे, प्रादेशिक परिवहन अधिकारी वसई

बेशिस्त रिक्षाचालक यांच्यावर कारवाई सुरूच आहे. वाहतुकीला अडथळे निर्माण करीत आहेत त्यांच्यावर कारवाईची मोहीम तीव्र केली जाणार आहेत. – प्रशांत लांगी, वाहतूक पोलीस निरीक्षक परिमंडळ २ 

Story img Loader