वसई: घनकचरा व्यवस्थापनाच्या ठेक्यासाठी पालिकेने ठरवून दिलेली अनामत रक्कम डिमांड ड्राफ्ट (डीडी) द्वारे देण्यासाठी ठेकेदारांना तांत्रिक अडचणी येत आहेत. त्यामुळे पालिकेने पुन्हा एकदा निविदेला १४ नोव्हेंबर पर्यँतची मुदत वाढ देण्यात आली आहे.

वसई – विरार महापालिका क्षेत्रातील दैनंदिन रस्ते सफाई, गटार सफाई, कचरा वर्गीकरण, कचरा संकलन करणे व संकलित कचरा क्षेपणभूमीवर वाहतूक करणे या कामाचा ठेका आता पाच वर्षांकरिता देण्यात येणार आहेत. त्यासाठी नव्याने निविदा प्रक्रिया राबविण्यात येत आहे. महापालिका हद्दीतील ९ प्रभागनिहाय ही निविदा काढण्यात आली आहे. नव्याने काढण्यात आलेल्या या निविदेत काही अटीतही शिथिलता देण्यात आली आहे.

यावेळी काढलेल्या निविदेत ठेकेदारांना एकापेक्षा जास्त प्रभागात काम करण्याची संधी सुद्धा देण्यात आली आहे. या प्रक्रियेमुळे पालिकेची आर्थिक बचत ही होणार आहे. याशिवाय ठेकेदाराला सुद्धा ठेकेदाराला सुद्धा काम करणे सोपे होणार आहे. दरम्यान, पालिकेने या कामासाठी गेल्यावर्षी पहिल्यांदा निविदा काढली होती. आतापर्यंत दोन निविदा यापूर्वी वेगवेगळ्या कारणासाठी रद्द करण्यात आल्या आहेत. आता तिसऱ्यांदा निविदा प्रक्रिया राबविण्यात येत असून, २६ सप्टेंबर २०२५ ते ४ नोव्हेंबर २०२५ या कालावधीत निविदा स्वीकारण्यात आल्या आहेत.

त्यानंतर निविदाधारकांना निविदा भरण्यास कमी वेळ मिळाल्याच्या कारणावरून ७ नोव्हेंबर पर्यंत मुदतवाढ देण्यात आली. मुदतवाढीनंतर ११ नोव्हेंबर रोजी या निविदा उघडण्याची तारीख होती. मात्र निविदेसोबत पालिकेने ठरवून दिलेली अनामत रक्कम डिमांड ड्राफ्ट (डीडी) द्वारे भरण्यास ठेकेदारांना तांत्रिक अडचणी निर्माण होत आहेत. त्यामुळे आता पुन्हा एकदा निविदा भरण्यास १४ नोव्हेंबर पर्यंत मुदतवाढ देण्यात आली आहे. यापूर्वी सुद्धा निविदा भरण्यास ठेकेदारांना कमी वेळ मिळाल्याच्या कारणावरून यापूर्वी सद्धा एक मुदतवाढ देण्यात आली होती.

वर्षभरापासून निविदांचा खेळ…

घनकचरा व्यवस्थापनाच्या कामासाठी सर्वप्रथम सन २०२४ ते २०२७ दरम्यान तीन वर्षांच्या कालावधीसाठी त्रिवार्षिक निविदा ११ ऑक्टोबर २०२४ रोजी प्रसिद्ध करण्यात आली होती. या प्रक्रियेत ठेकेदारांनी दिलेले लघुत्तम दर पालिकेला मान्य नव्हते त्यामुळे ठेकेदार, तांत्रिक सल्लागार आणि पालिकेची वाटाघाटीसाठी बैठक घेण्यात आली.त्यातून ही मार्ग निघाला नव्हता त्यामुळे ती निविदा सुद्धा रद्द करावी लागली होती.

त्यानंतर मे २०२५ मध्ये नव्याने दुसऱ्यांदा ई निविदा प्रक्रिया राबवली. मात्र यामध्ये देखील प्रशासकीय अडचणीचे कारण देत पालिकेने ती रद्द करत इतर महापालिकेच्या निविदांचा अभ्यास करून तिसऱ्यांदा निविदा प्रक्रिया राबविण्याचा निर्णय घेतला होता. त्यानुसार आता तिसऱ्यांदा निविदा प्रक्रिया राबविण्यात येत आहे.मात्र त्यातही येत असलेल्या अडचणीमुळे ही निविदा प्रक्रिया पूर्ण होईल की नाही याबाबत प्रश्न उपस्थित होत आहे.

कचरा व्यवस्थापनाचा बोजवारा

पालिकेकडून शहरात दररोज स्वच्छता केली जात असल्याचा दावा करण्यात येत आहे. असे जरी असले तरीही विविध ठिकाणच्या भागात कचऱ्याचे ढिगारे जागच्या जागी पडून आहेत. त्यामुळे आजूबाजूच्या परिसरात अस्वच्छता पसरू लागली आहे. याशिवाय वृक्ष छाटणी नंतर निघालेला कचरा ही वेळेत उचलला जात नसल्याची तक्रार नागरिक करीत आहे. शहरातील कचरा व्यवस्थापन योग्य पध्दतीने राबवून शहर स्वच्छ ठेवावे अशी मागणी नागरिक करू लागले आहेत.