वसई : उन्हाळ्याच्या तीव्र झळांपासून दिलासा देणाऱ्या शहाळ्याचे दर आता वाढले आहेत. प्रति शहाळे २० ते ३० रुपये झाली असून परराज्यातून नारळांची आवक घटल्यामुळे किंमती वाढल्या असल्याचे विक्रेत्यांचे म्हणणे आहे.
फेब्रुवारी महिन्यापासून जरी उन्हाळा सुरू झाला असला तरी एप्रिल आणि मे महिन्यात सुरू असणाऱ्या ऊन-सावलीच्या खेळामुळे तापमानात कमालीची वाढ झाली आहे. दिवसेंदिवस वाढत जाणारे तापमान आणि जाणवणाऱ्या उन्हाच्या झळा यामुळे अनेकांना उष्माघाताचा त्रास होत आहे.
चक्कर येणे, अशक्तता जाणवणे तसेच उन्हाच्या कडाक्यापासून स्वतःचा बचाव करण्यासाठी अनेकजण शीतपेये आणि नारळ पाण्याला पसंती देत आहेत. त्यामुळे इतर ऋतुंच्या तुलनेत उन्हाळ्यात शहाळ्यांची मागणी मोठी असते. ही मागणी पूर्ण करण्यासाठी दक्षिणी राज्यातून वसई विरारमधील विक्रेते नारळ मागवतात. तर शहाळ्याच्या आकारावरून त्याचे दर ठरतात.
फेब्रुवारी ते मार्च महिन्यात मोठ्या प्रमाणात होत असलेली शहाळ्यांची आवक एप्रिल अखेरीस घटली आहे. तर ४० ते ५० रुपयांना विकली जाणारी लहान शहाळी बाजारात यायची बंद झाल्याने नारळ पाणी विक्रेत्यांनी शहाळ्याच्या दरात २० ते ३० रुपयांनी वाढ केली आहे. त्यामुळे आता ग्राहकांना ६० ते ७० रुपयांची शहाळी विकत घ्यावी लागत आहेत.
परराज्यातील आवक घटल्यामुळे विक्रीवर परिणाम
वसई विरार शहरात तमिळनाडू राज्यातून मागवलेल्या शहाळ्यांची विक्री केली जाते. मात्र एप्रिल महिन्यापासून लहान शहाळ्यांची आवक बंद झाली आहे. त्यामुळे बाजारात मोठी शहाळी फक्त विक्रीसाठी आहेत. मात्र, मागणीच्या तुलनेत ती कमी असल्यामुळे घाऊक विक्रेत्यांनी शहाळ्याच्या दरात वाढ केली आहे. परिणामी किरकोळ बाजारातही शहाळ्यांचे दर वाढले असल्याची माहिती, मितेश कुमार या विक्रेत्याने दिली.
