वसई : नोव्हेंबर महिन्याच्या सुरुवातीपासून वसई विरार शहरात कडाक्याची थंडी पडली आहे. तरी आज दरम्यान शहरात घोणस प्रजातीच्या सर्पांचा वावर वाढला आहे. अवघ्या तीन दिवसात एकूण पाच ठिकाणी विषारी सर्प आढळून आला आहे. सप्टेंबर-ऑक्टोबर महिन्यात झालेल्या अवकाळी पावसाने विश्रांती घेतल्यानंतर वातावरणात गारठा वाढला आहे.
हिवाळा ऋतू अनेक पशूंच्या प्रजननाचा काळ मानला जातो आणि घोणस या विषारी सापाचाही हाच प्रजनन काळ आहे. तर थंडी सहन होत नसल्यामुळे उबदार आश्रयाच्या शोधात असणारा घोणस सर्प वसई विरारमधील शहरी तसेच ग्रामीण भागात आढळून येत आहे. गेल्या तीन दिवसात गिरीज, वासळई, मांडलई, मर्सिस या ठिकाणी नागरी वस्तीत ३ ते ५ फुटांचे घोणस सर्प आढळून आले आहेत. त्यामुळे नागरिकांना खबरदारी घेण्याचे आवाहन सर्पमित्र हेमंत पवार यांनी केले आहे.
घोणस हा भारतातील चार मोठ्या विषारी सापांपैकी एक आहे. काश्मीर वगळता देशातील विविध राज्यात हा सर्प आढळून येतो. रसेल्स वायपर या नावानेही या सर्पाला ओळखले जाते. या सापाची लांबी सरासरी तीन ते पाच फूट इतकी असते. हा शरीराने काहीसा स्थूल असून याची शेपूट आखूड असते. तसेच त्याचे डोके त्रिकोणी असून डोळे उभ्या बाहुलीचे असतात. या सापाच्या शरीरावर तपकिरी व पांढरी किनार असलेले गोल गडद ठिपके असतात. सोन्या परड, कांबळ्या, सूर्य कांडर, परड, पिरीमिटी, फरड, क्सडो, माहोळ, खऱ्या महाडोर, बहिऱ्या परड, जोगीरा, पिरीमिली, अशा विविध नावांनी स्थानिक भाषांमध्ये हा साप ओळखला जातो. तर वारुळात, उंदरांच्या बिळात, गवताळ भागात हा साप प्रामुख्याने आढळतो.
घोणस उंदीर आणि लहान सस्तन प्राणी खातो, ज्यामुळे तो शेतातील उंदरांची संख्या नियंत्रित ठेवण्यास मदत करतो. मे ते जुले या महिन्यांदरम्यान मादी पिलांना जन्म देते. एकावेळी मादी ६ ते ६३ पिलांना जन्म देऊ शकते. पिले जन्माच्या वेळी २९ सेमी लांब असतात. घोणस हा प्रामुख्याने निशाचर (रात्री फिरणारा) आहे, परंतु दिवसाही तो दिसू शकतो. डिवचला गेला असता, घोणस वेटोळे करून मोठ्याने फुत्कार सोडतो, जी धोक्याची सूचना आहे. याच्या हल्ल्याचा वेग सेकंदाला ८ फूट एवढा असतो. याचा अर्थ, दोन फुटांवरच्या व्यक्तीवर तो फक्त एकचतुर्थांश सेकंदात (०.२५ सेकंद) चावा घेऊ शकतो. त्याच्या या वेगामुळे बचाव करणे जवळजवळ अशक्य होते.
सर्पदंशापासून वाचण्यासाठी आवश्यक खबरदारी
शेतात काम करताना आणि रात्री बाहेर पडताना नेहमी जाड बूट (गमबूट) घालावेत. घरात कोणत्याही प्रकारची अडगळ करून ठेवू नये, कारण साप अशा ठिकाणी आश्रय घेतात. बूट किंवा चप्पल घालण्यापूर्वी ते तपासून पाहावेत, कारण त्यातही साप लपून बसण्याची शक्यता असते. साप आढळल्यास त्याला डिवचू नये किंवा मारू नये. तर तातडीने प्रशिक्षित सर्पमित्राला पाचारण करून सुरक्षितरित्या सापाला पकडून नैसर्गिक अधिवासात सोडण्याची व्यवस्था करावी, असे सर्पमित्रांकडून सांगण्यात आले आहे.
