वसई: वसई विरार शहरातील वाढते शहरीकरण, सध्याची वाहतूक व्यवस्था आणि पुढील ३० वर्षात या वाहतूक व्यवस्थेत होणारे बदल लक्षात घेता महापालिकेकडून सर्वसमावेशक शहर वाहतूक आराखडा तयार केला जाणार आहे. हा आराखडा तयार करण्यासाठी पालिकेकडून वाहतूक नियोजन कक्षाची स्थापना करण्यात येणार असून तंत्र सल्लागारांची नियुक्ती करण्यात येणार आहे.
वसई विरार महापालिकेत शुक्रवारी पार पडलेल्या महासभेत शहरातील वाहतूक कोंडी, वाहतूक नियोजन, पार्किंग सुविधा, झपाट्याने होणारे शहरीकरण आणि वाहतूक व्यवस्था याविषयी चर्चा करण्यात आली. यावेळी केंद्र सरकारच्या राष्ट्रीय शहरी वाहतूक धोरणाच्या अनुषंगाने महाराष्ट्र शासनाच्या नगरविकास विभाग सचिवांसह पार पडलेल्या बैठकीनंतर शहरातील वाहतूक व्यवस्था आणि ३० वर्षात त्यात होत जाणारे बदल याचा अभ्यास करून सर्वसमावेशक शहर वाहतूक आराखडा (सीएमपी) तयार करण्यात येणार असल्याची माहिती अतिरिक्त आयुक्त दीपक सावंत यांनी दिली.
या आराखड्याच्या माध्यमातून शाश्वत वाहतूक व्यवस्था तयार केली जाणार आहे. पर्यावरणपूरक असून सुरक्षित पाहिजे हे या मागचे मूळ उद्दिष्ट आहे. यासाठी रेल्वे, बस, सार्वजनिक वाहतूक व्यवस्था यांचे सर्वेक्षण केले जाणार आहे. तसेच प्रवाशांच्या वाहतूक पद्धती, जंक्शनची पाहणी, पादचारी आणि सायकल स्वारांची सोय रेल्वे स्थानक परिसरातील कोंडीचा अभ्यास, उड्डाणपूलांची पाहणी करून हा आराखडा तयार केला जाणार आहे.
या कामावर नियंत्रण ठेवण्यासाठी वाहतूक नियोजन कक्षाची स्थापना करण्यात येणार आहे. तसेच त्यात अर्बन प्लॅनर, वाहतूक नियोजन, जीआयएस प्लॅनर अशा तंत्र सल्लागारांची नियुक्ती केली जाणार आहे. तसेच आराखडा बनवताना मार्गातील मिसिंग लिंक, आधुनिक पार्किंग व्यवस्था, वाहतूक केंद्र, टर्मिनल सुविधा, तसेच नवी मुंबई विमानतळाला जोडणारा जूचंद्र येथील जलमार्ग, बुलेट ट्रेनच्या १३ स्थानकातील वाहतूक सेवा यांचा विचार केला जाणार आहे.
महासभेत सादर झालेल्या या प्रस्तावावर प्रतिक्रिया देत नगरसेवकांनी पार्किंग सुविधा तसेच सद्यस्थितीत वाहतूक कोंडीवर उपाययोजना करण्याची मागणी केली. त्या नगरसेवकांच्या या मागणीची दखल घेत सर्वसमावेशक शहर वाहतूक आराखडा सुनियोजित पद्धतीने तयार करण्यात यावा, असे निर्देश महापौर अजीव पाटील यांनी दिले.
या प्रकल्पासाठी किती खर्च येईल हे सांगता येणार नाही. राज्य शासन किंवा एनआययूए सारख्या शासकीय संस्थांकडून निधी मिळावा यावर आपण भर देणार आहोत. तसेच त्यानंतरही जर काही खर्च आला तर त्याबाबत महासभेत ठराव मांडण्यात येईल. – पृथ्वीराज बी. पी. , महापालिका आयुक्त
