वसई: वसई-विरार शहर महानगरपालिका क्षेत्रात सध्या मोठ्या प्रमाणावर गृहनिर्माण आणि पायाभूत सुविधांची बांधकामे सुरू आहेत. मात्र, या बांधकामादरम्यान सुरक्षेचे आणि स्वच्छतेचे नियम धाब्यावर बसवले जात असल्यामुळे शहरातील अनेक प्रमुख रस्त्यांवर चिखलाचे साम्राज्य निर्माण झाले आहे. बांधकामाच्या ठिकाणाहून निघणारी माती, चिखल आणि सिमेंटचे पाणी थेट मुख्य रस्त्यांवर तसेच गटारांमध्ये पसरत असल्याने दुचाकीस्वार, पादचारी आणि इतर वाहनधारकांच्या सुरक्षेचा गंभीर प्रश्न निर्माण झाला आहे.

​मागील काही वर्षांपासून वसई-विरार शहराचा विकास झपाट्याने होत असून ठिकठिकाणी भव्य गृहनिर्माण प्रकल्पांची कामे प्रगतीपथावर आहेत. या प्रकल्पांमुळे परिसरात अवजड वाहनांची वर्दळ मोठ्या प्रमाणावर वाढली आहे. या वाहनांच्या चाकांना लागून येणारी माती रस्त्यावर पसरत आहे, तर काही ठिकाणी सुरू असलेल्या ‘पायलिंग’च्या कामातील चिखलही थेट रस्त्यावर येत आहे.

​नालासोपारा पश्चिमेतील पानबाई नगर परिसरात एका विकासकाकडून बांधकामादरम्यान पायलिंगची माती थेट मुख्य रस्त्यावर सोडल्याने रस्ता अत्यंत निसरडा झाला असल्याचे येथील नागरिकांनी सांगितले आहे. केवळ नालासोपारा नव्हे तर वसई आणि विरारच्या इतर अनेक भागांतही दररोज हेच चित्र पाहायला मिळत आहे. या चिखलामुळे दुचाकी घसरून अपघात होण्याचा धोका प्रचंड वाढला आहे.

​याशिवाय, बांधकामातून निघणारा गाळ आणि राडारोडा थेट महापालिकेच्या गटारांमध्ये ढकलला जात असल्याने जलनिस्सारण व्यवस्था पूर्णपणे कोलमडली आहे. त्यामुळे किरकोळ पावसातही सखल भागांत पाणी साचून मोठ्या पुराचा धोका निर्माण झाला आहे. सुरक्षेसाठी बांधकामाच्या ठिकाणी जाळी (नेट) लावणे आणि रस्ते नियमित साफ करणे यांसारख्या प्राथमिक नियमांचेही विकासकांकडून सर्रास उल्लंघन होत आहे. त्यामुळे अशा बेजबाबदार विकासकांवर महापालिकेने तात्काळ कडक कारवाई करावी, अशी तीव्र मागणी स्थानिक नागरिकांमधून केली जात आहे.

​महापालिकेकडून नोटीसा बजावल्याचा दावा

“विकासकामांदरम्यान रस्त्यावर चिखल पसरत असल्याच्या अनेक तक्रारी प्राप्त झाल्या आहेत. नियमांचे उल्लंघन करणाऱ्या अशा सर्व विकासकांना नोटिसा पाठवण्याची प्रक्रिया सुरू करण्यात आली आहे,” अशी माहिती घनकचरा व स्वच्छता विभागाचे सहायक आयुक्त जितेंद्र नाईक यांनी दिली.