वसई: कंत्राटी कर्मचाऱ्यांच्या विविध प्रलंबित मागण्यांसाठी वसई विरार महापालिका मुख्यालयावर श्रमजीवी कामगार संघटनेने पुकारलेल्या आंदोलनाला अखेर यश आले आहे. मंगळवारी आंदोलनकर्त्यांसोबत झालेल्या वाटाघाटींनंतर पालिकेने कामगारांच्या प्रमुख मान्य केल्या आहेत. वसई विरार महापालिका मुख्यालयात मंगळवारी श्रमजीवी कामगार संघटनेचे कार्याध्यक्ष सुलतान पटेल यांच्या नेतृत्वाखाली पालिकेच्या घनकचरा, पाणीपुरवठा तसेच विविध विभागातील कंत्राटी कर्मचाऱ्यांनी प्रलंबित मागण्यांसाठी काम बंद आंदोलन पुकारले होते.
आंदोलनादरम्यान मोठ्या संख्येने कामगारांनी एकत्र येत वेतनवाढ, कामाच्या तासांतील तफावत, थकीत निवृत्तीवेतन, विमा संरक्षण यांसह विविध प्रलंबित प्रश्न मार्गी लावण्याची मागणी पालिकेकडे केली. तसेच कामगारांच्या मागण्या पूर्ण होईपर्यंत मे. अनंत इंटरप्रायजेस, आर. बी. इन्फ्रा व अर्चना एंटरप्रायसेस या ठेकेदारांना देयके अदा न करण्याची भूमिकाही आंदोलनकर्त्यांनी घेतली.
कामगारांनी श्रमजीवी कामगार संघटनेची गाणी गात तसेच जोरदार घोषणाबाजी करत संपूर्ण परिसर दणाणून सोडला. कामगारांचा वाढता आक्रोश लक्षात घेत पालिका आयुक्तांनी संघटनेच्या शिष्टमंडळासह चर्चा केली व चर्चेअंती कामगारांच्या अनेक महत्त्वाच्या प्रश्नांवर सकारात्मक निर्णय घेण्यात आले. तसेच मृत कर्मचारी विजय घरत यांच्या कुटुंबीयांना ५ लाखांचा धनादेशही यावेळी देण्यात आला. यानंतर सलग ९ ते १० तास सुरू असलेला संप कर्मचाऱ्यांकडून मागे घेण्यात आला.
श्रमजीवी संघटनेने दिलेल्या माहितीनुसार, कामगारांची थकीत ईएसआयसी रक्कम ठेकेदाराकडून जमा करून घेणे, मृत कर्मचाऱ्यांच्या कुटुंबांना आर्थिक मदत देणे, प्रलंबित सुट्टीचा पगार गणेशोत्सवापर्यंत अदा करणे, गटार सफाई कामगारांचा भविष्य निर्वाह निधी ठेकेदाराकडून भरून घेणे, सुरक्षा साहित्याचे व गणवेशाचे वाटप अशा विविध मागण्या पालिकेकडून मंजूर करण्यात आल्या आहेत.
