वसई:- वसई विरार महापालिका क्षेत्रातील प्रदूषण कमी करण्यासाठी विविध उपाययोजना आखण्यात येत आहेत. याच पार्श्वभूमीवर शहरातील सहा ठिकाणच्या स्मशानभूमीत ‘पर्यावरण पूरक’ अंत्यसंस्कार यंत्रणा कार्यान्वित केली जाणार आहे. यासाठी १० कोटी ४७ लाखांचा निधी खर्च करण्यात येणार असून याबाबतचा प्रस्ताव ही महासभेने मंजूर केला आहे.

वसई विरार शहरात विविध ठिकाणच्या भागात मृतांवर अंत्यसंस्कार करण्यासाठी शंभर हून अधिक स्मशानभूमी बांधल्या आहेत. काही ठिकाणी स्मशानभूमीत अंत्यसंस्कार विधीच्या वेळी निघणारा धूर बाहेर सोडण्यासाठी चिमण्या ही बस
विण्यात आल्या नाहीत यामुळे हा धूर आजूबाजूच्या भागात व नागरी वस्तीच्या भागात पसरून प्रदूषण निर्माण होत असते. तर काही ठिकाणी स्मशानभूमीची दुरवस्था यासह सोयी सुविधांचा अभाव जाणवतो. याबाबत अनेकदा नागरिक पालिकेकडे तक्रारी करतात.शहरातील प्रदूषण नियंत्रण करण्यासाठी त्यावर विविध अंगाने उपाययोजना करण्यास सुरुवात केली आहे.त्याच एक भाग म्हणून आता काही ठिकाणच्या भागात पर्यावरणपूरक अंत्यसंस्कार यंत्रणा कार्यान्वित केली जाणार आहे.

शहरातील दिवाणमान, नवघर, तुळींज, आचोळे, फुलपाडा आणि विराटनगर या ६ ठिकाणच्या स्मशानभूमींमध्ये ‘इको-फ्रेंडली’ अंत्यसंस्कार यंत्रणा बसविण्याचा निर्णय पालिकेने घेतला आहे. या संपूर्ण प्रकल्पासाठी १० कोटी ४७ लाख ३४ हजार इतका निधी खर्च केला जाणार आहे.याबाबत प्रस्ताव प्रशासनाने सोमवारी महासभेत मंजुरीसाठी ठेवला होता. त्या प्रस्तावाला महासभेने मंजुरी दिली आहे.

प्रदूषण रोखण्यास मदत

नवीन ‘इको-फ्रेंडली’ गॅसिफिकेशन तंत्रज्ञानावर आधारित अंत्यसंस्कार प्रणालीमुळे लाकडाचा वापर ४५० किलो वरून
अवघ्या १२५ किलोवर येईल, तर अंत्यसंस्काराचा वेळ ४-५ तासांऐवजी केवळ दीड तासावर येईल. ही प्रणाली ‘नॅचरल ड्राफ्ट’ तत्त्वावर चालणारी असून यातील स्क्रबर युनिट सौरऊर्जेवर चालते, तसेच ४-टप्प्यांच्या गाळणी प्रक्रियेनंतर १०० फूट उंच चिमणीद्वारे धूर उत्सर्जित केला जातो. सर्व हिंदू धार्मिक विधी व परंपरांचे तंतोतंत पालन करणाऱ्या या तंत्रज्ञानामुळे हरितगृह वायू उत्सर्जनात ६०% घट होऊन केवळ २% अवशेष शिल्लक राहतात, ज्यामुळे प्रदूषण रोखण्यास मोठी मदत होणार असल्याचा दावा महापालिका प्रशासनाने केला आहे.

गॅस दाहिन्यांच्या जनजागृती बाबत नाराजी

पर्यावरणाच्या रक्षणासाठी वसई- विरार महापालिकेने नवघर, पाचूबंदर, विराट नगर , आचोळे, समेळपाडा व अन्य दोन अशा सात ठिकाणच्या स्मशानभूमीत गॅस दाहिन्या सुरू केल्या होत्या. मात्र त्या गॅस दाहिन्यांकडे नागरिकांनी पाठ फिरवली आहे. याबाबत प्रशासनाकडून योग्य ती जनजागृती होतच नाही त्यामुळे प्रतिसाद मिळत नसल्याचे सांगत नगरसेवकांनी नाराजी व्यक्त केली. या गॅस दहिन्यांचा ही वापर वाढवा यासाठी सर्वांनी एकत्रित प्रयत्न करणे गरजेचे असल्याचे महापौर अजीव पाटील यांनी सांगितले. जे लाकडाचा वापर करतील त्यांना ही अतिरिक्त शुल्क आकारणी करण्याची तरतूद करण्यात यावी जेणेकरून ते गॅस दहिन्यांचा वापर करण्यास नागरिक पुढे येतील अशी भूमिका ही त्यांनी महासभेत मांडली.