वसई: वसई विरार शहरातील स्मशानभूमींमध्ये लाकडे उपलब्ध नसल्यामुळे किंवा लाकडांचा तुटवडा असल्यास मृताच्या नातेवाईकांना अनेकदा गैरसोयीला सामोरे जावे लागत होते. पण, या समस्येवर तोडगा म्हणून आता लाकडे पुरवणाऱ्या कंत्राटदाराला स्मशानभूमीत लाकडे जमा केल्यावर त्याचे जीपीएस छायाचित्र पालिकेला पाठवणे अनिवार्य करण्यात आले आहे.
वसई विरार शहरात एकूण १०२ स्मशानभूमी आहेत. तर यापैकी सर्वाधिक वापरात असणाऱ्या ५६ स्मशानभूमींमध्ये महापालिकेकडून मोफत जळाऊ लाकडांचा पुरवठा केला जातो. तसेच लाकडांचा वापर कमी व्हावा व प्रदूषण टाळता यावे, यासाठी अनेक स्मशानभूमींमध्ये महापालिकेकडून पर्यावरणपूरक गॅसदाहिन्या बसविण्यात आल्या आहेत. मात्र, आजही अंत्यसंस्कारांसाठी लाकडांची चिता रचण्याचा पारंपरिक पर्याय निवडण्याकडे नातेवाईकांचा कल अधिक आहे.
त्यामुळे पालिकेकडून या स्मशानभूमींमध्ये लाकडांचा पुरवठा केला जातो. मात्र, अलीकडे दुरुस्तीविना खालावलेली स्मशानभूमींची अवस्था, अस्वच्छता व कामगारांच्या कमतरतेमुळे होणारी गैरसोय यामुळे मृताचे नातेवाईक वैतागलेले असताना जळाऊ लाकडांच्या तुटवड्यामुळे या समस्येत अधिकच भर पडली होती. कंत्राटदाराकडून अनियमित व अपुरा लाकडांचा पुरवठा या गैरसोयीस कारणीभूत ठरत होता.
त्यामुळे या समस्येवर तोडगा म्हणून लाकडांचा पुरवठा करणाऱ्या कंत्राटदाराने स्मशानभूमीत लाकूड जमा केल्यावर त्याचे जीपीएस छायाचित्र स्मशानभूमी विभागाकडे सादर करणे अनिवार्य करण्यात येणार आहे. यामुळे भविष्यात लाकडाचा पुरवठा सुरळीत होण्यास व नागरिकांची गैरसोय टाळण्यास मदत होईल, असे मत उपायुक्त करुणा जुईकर यांनी व्यक्त केले आहे.
