भाईंदर : मोबाईल टॉवरवरील बॅटऱ्या चोरणाऱ्या टोळीचा नायगाव पोलिसांनी पर्दाफाश करत तीन आरोपींना अटक केली आहे. या कारवाई दरम्यान २४ हजार रुपये किंमतीचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. वसई विरार शहरात घरफोडी, मोबाईल चोरी, वाहन चोरी, सोनसाखळी चोरीचे प्रकार घडत असताना, आता शहरात नेटवर्किंगसाठी लावण्यात आलेल्या मोबाईल टॉवरच्या बॅटऱ्या चोरून नेण्याचे प्रकार समोर येऊ लागले आहेत.
नायगाव पूर्वेला इंडस टॉवर लिमिटेड कंपनीचे मोबाईल टॉवर आहेत. शनिवार, ३ जानेवारी रोजी पहाटेच्या सुमारास अज्ञात चोरट्यांनी मोबाईल टॉवरवरील अंदाजे २४ हजार किंमतीच्या २४ बॅटऱ्या चोरल्याची तक्रार कंपनीकडून नायगाव पोलीस ठाण्यात दाखल करण्यात आली.
या प्रकरणाची गंभीर दखल घेत वरिष्ठ पोलीस निरीक्षकांच्या मार्गदर्शनाखाली गुन्हे प्रकटीकरण पथकाची दोन स्वतंत्र पथके तयार करून तपास सुरू करण्यात आला. तांत्रिक विश्लेषण आणि गुप्त माहितीच्या आधारे पोलिसांनी मुंबईतील गोवंडी परिसरात सापळा रचून तोसीफ हबीब शेख(३६), मोहम्मद अरबाज हनीफ शेख (२५) आणि हुसेन नुरमोहम्मद सय्यद (३२) या तिघांना ताब्यात घेतले. या कारवाईत पोलिसांनी २० हजार रुपये रोख रक्कम तसेच चोरी करण्यासाठी वापरलेली सुमारे १ लाख रुपये किंमतीची गाडी जप्त केली आहे.
ही कारवाई वरिष्ठ पोलीस निरीक्षक संजय हजारे व पोलीस निरीक्षक विजय कदम यांच्या नेतृत्वाखाली सहायक पोलीस गणेश केकान, पोलीस उपनिरीक्षक ज्ञानेश्वर आसबे, पोलीस हवालदार शेखर पवार, सचिन ओलेकर, पोलीस अंमलदार चेतन ठाकरे, सचिन खंताळ, अमर पवार, अशोक पाटील आणि पांडुरंग महाले यांच्या पथकाने केली आहे.

