वसई: बांधकाम व्यवसायीकांचे स्टील चोरी करणाऱ्या टोळीचा गुन्हे प्रकटीकरण कक्ष २ च्या पथकाने पर्दाफाश केला आहे. वसई पूर्व येथील मोकळ्या मैदानातून सहा आरोपींना अटक करण्यात आली असून, त्यांच्याकडून ४० लाखांहून अधिक किंमतीचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे.

वसई पूर्वेच्या अग्रवाल नगरी येथील मोकळ्या मैदानात मंगळवारी स्टील ने भरलेला ट्रेलर उभा होता. याच ट्रेलर मध्ये असलेले स्टील चोरी करून एका टेम्पो मध्ये भरून नेत होते. याची गुप्त माहिती गुन्हे प्रकटीकरण कक्ष २ च्या पथकाला मिळाली होती. माहिती मिळताच पोलिसांनी तात्काळ छापा टाकून कारवाई केली. यात अच्छेलाल जगमोहन मौर्या (५५), राकेश रामजित उपाध्याय(३४), दिनदयाळ लालबहादुर पांडे (३९), यानुर अफसरअली शेख (२१) शुभम राजेश सिंग जावेद साहिद शेख (२६) अशा सहा आरोपींना अटक करण्यात आली आहे.याप्रकरणी आचोळे पोलीस ठाण्यात भारतीय न्याय संहिता कलम ३०३(२), ३(५) प्रमाणे गुन्हा दाखल केला आहे. यात १ हजार २०० किलो स्टील यासह चोरून नेण्यासाठी वापरलेले वाहन असा एकूण ४० लाख रुपयांचा मुद्देमाल पोलिसांनी जप्त केला आहे.

हे स्टील वाडा येथील रिजेन्सी प्रायव्हेट लिमिटेड कंपनीमधून नालासोपारा येथील हितेश स्टील सिंडीकेट प्रायव्हेट लिमिटेड येथे खाली करण्याकरिता आणले असल्याची माहिती पोलिसांनी दिली आहे.

ही कारवाई पोलीस आयुक्त निकेत कौशिक, अपर पोलीस आयुक्त दत्तात्रय शिंदे, पोलीस उप आयुक्त (गुन्हे) संदीप डोईफोडे, आणि सहायक पोलीस आयुक्त (गुन्हे) मदन बल्लाळ यांच्या मार्गदर्शनाखाली, गुन्हे शाखा-२ वसई युनीटचे पोलीस निरीक्षक अविराज कुराडे व त्यांच्या पथकाने पार पाडली.