वसई : वसई विरार शहरातील बंद दगडखाणी सध्या पर्यटकांसाठी आकर्षणाचा केंद्रबिंदू ठरत आहेत. मात्र, सुरक्षेचा अभाव, यापूर्वी घडलेल्या दुर्घटना लक्षात घेता पर्यटकांचा दगडखाणींकडे वाढता ओढा कमी करण्यासाठी प्रशासनाने ठोस उपाययोजना कराव्यात अशी मागणी नागरिकांकडून केली जात आहे.

वसई विरार शहरात चिंचोटी, मांडवी, कामण, पेल्हार, राजावळी, टीवरी अशा विविध ठिकाणच्या भागात ३८ दगडखाणीं आहेत. या दगडखाणींमधून दगडाचे उत्खनन केले जाते. सद्यस्थितीत ३८ पैकी तब्बल २३ दगड खाणी या बंद असून यातील अनेक खाणींमध्ये पाणी साचले आहेत. सुरक्षा जाळ्यांचा अभाव, सूचना पाट्या नसणे तसेच खाणींच्या खोलीचा नसलेला अंदाज आणि निर्जन परिसर यामुळे आता या खाणी नागरिकांसाठी मृत्यूचा सापळा बनत आहेत.

अवघ्या वर्षभरात शहरातील खाणींमध्ये बुडून एकूण सहा जणांचा मृत्यू झाला आहे. मात्र, वारंवार अशा घटना समोर येऊनही स्थानिक नागरिकांकडून या खाणींचा वापर सुरूच आहे. तर वाढता उन्हाळा आणि शाळा – महाविद्यालयांना असलेली सुट्टी अशी संधी साधून लहान मुले, तरुण-तरुणी या खाणींमध्ये वरचेवर पोहण्यासाठी येत असल्याचे दिसून येत आहे. त्यामुळे वापरात नसलेल्या खाजगी आणि सरकारी दगडखाणींवर सुरक्षा जाळ्या बसवून त्या कायमच्या बंद करण्यात याव्यात. तसेच खाणींशेजारी सूचना फलक लावावेत, अशी मागणीही नागरिकांकडून केली जात आहे. याबाबत तहसीलदारांशी संपर्क साधला असता कोणतीही प्रतिक्रिया मिळाली नाही.

समाजमाध्यमांमुळे खदाणींकडे पर्यटकांचा ओढा

तसेच समाजमाध्यमांवर व्हायरल होणाऱ्या चित्रफिती, फार प्रसिद्ध नसलेल्या अशा ठिकाणांची पसरवली जाणारी इत्यंभूत माहिती आणि रिसॉर्ट किंवा समुद्रकिनाऱ्यांवर असलेल्या गर्दीच्या तुलनेत कमी गर्दी, अशा विविध बाबींमुळे वसईबाहेरच्या पर्यटकांची पावले आता या बंद दगडखाणींकडे वळू लागली आहेत. पर्यटकांच्या वाढत्या गर्दीमुळे भविष्यात एखादी दुर्घटना घडण्याची शक्यता स्थानिक रहिवाशांकडून वर्तवली जात आहे.

यापूर्वी घडलेल्या दुर्घटना

  • १४ जानेवारी २०२६ : जोगेश्वरीहून विरारला नातेवाईकांकडे आलेल्या विनायक सितप (४८) आणि त्यांची मुलगी ईकांशा सितप (१५) यांचा दगडखाणीत बुडून मृत्यू झाला.
  • ४ मार्च २०२६ : वसई पूर्वेच्या राजावळी येथील खदाणीत बुडून १५ वर्षीय आयान मनिहार या मुलाचा मृत्यू झाला होता.
  • ४ मार्च २०२६ : विरार पूर्वेच्या मांडवी येथील जाधवपाडा येथील खदाणीत खेळायला गेलेल्या १० वर्षीय मुलाचा बुडून मृत्यू
  • २ एप्रिल २०२६ : रोजी चिंचोटी येथील दगड खाणीत अंघोळ करण्यासाठी गेलेल्या ३० वर्षीय तरुणाचा बुडून मृत्यू झाला होता.
  • ३० एप्रिल २०२६ : रोजी चिंचोटी येथील दगडखाणीत या १२ वर्षीय रूकसार हबिउल्ला खान या मुलीचा मृत्यू झाला.