वसई:- वसई-विरार शहर महापालिकेच्या नवीन विकास आराखड्याची (डीपी) प्रतीक्षा आता आणखी लांबण्याची शक्यता आहे. तांत्रिक अडचणी आणि रिक्त पदांच्या कारणास्तव, हा आराखडा नियोजित वेळेत पूर्ण करणे शक्य नसल्याने आता विकास आरखड्याला मुदत वाढ देण्यात आली आहे. या मुदतवाढीचा प्रस्ताव महासभेत मंजूर करण्यात आला असून येत्या वर्षभरात हा विकास आराखडा पूर्ण केला जाईल असा दावा महापालिकेने केला आहे.
मागील काही वर्षांपासून वसई विरार शहराचे नागरीकरण झपाट्याने वाढले आहे. कोणत्याही प्रकारचे शहर नियोजन नसल्याने शहरातील नागरिकांना विविध प्रकारच्या समस्यांना तोंड द्यावे लागत आहे. वसई विरारसाठी २००१ ते २०२१ या कालावधीसाठी विकास आराखडा तयार केला होता. मात्र या जुन्या विकास आराखड्याचा कालावधी उलटून तीन वर्षे उलटून गेली आहेत. ३० ऑक्टोबर २०२३ रोजी सुधारित आराखड्यासाठी पालिकेने नोटीस प्रसिद्ध केली होती. नियमानुसार हा आराखडा नोव्हेंबर २०२५ पर्यंत प्रसिद्ध होणे आवश्यक होते.
मात्र, निर्माण झालेल्या विविध तांत्रिक अडचणींमुळे विकास आराखडा अजूनही पूर्ण होऊ शकलेला नाही. त्यामुळे नुकत्याच पार पडलेल्या महासभेत विकास आरखड्याला मुदत वाढ देण्याचा प्रस्ताव सादर करण्यात आला होता. महासभेत झालेल्या चर्चेनंतर या या प्रस्तावाला मंजुरी देण्यात आली असून एक वर्षाच्या कालावधीत हा आराखडा तयार करण्यात येईल त्या दृष्टीने प्रयत्न केले जातील असे महापौर अजीव पाटील यांनी महासभेत स्पष्ट केले आहे.
काय असेल विकास आराखड्यात?
सध्या शहराची लोकसंख्या २५ लाख आहे. पुढील २० वर्षात ही लोकसंख्या ४५ ते ५० लाख गृहीत धरून हा विकास आराखडा तयार केला जाणार आहे.
यात प्रामुख्याने रस्ते, उड्डाणपूल, पाणी प्रकल्प योजना शहरात रुग्णालये, उद्याने, क्रिडांगणे आदींची आरक्षणे टाकण्यात येणार आहेत. याशिवाय या विकास आराखड्यात समूह पुर्नविकास योजना (क्लस्टर डेव्हलपमेंट) ची तरतूद देखील केली जाणार आहे. यासाठी नव्याने आरक्षणे टाकली जाणार आहेत. त्यामुळे तयार करण्यात येत असलेला आरखडा सर्वसमावेशक अशा स्वरूपाचा असणार आहे.
पर्यावरणाचा समतोल राखला जावा
वसई विरार शहरात आतापर्यंत जे विकास आराखडे व जो विकास झाला आहे. तो केवळ विकासकांच्या व राजकीय नेत्यांच्या फायद्यासाठी झाला आहे. विविध प्रकल्पांमुळे येथील मासेमारी, शेती, मिठागरे, अन्य पारंपारिक व्यवसायावर परिणाम झाला आहे. त्यामुळे तयार होत असलेला आराखडा हा पर्यावरण संवर्धन, जैवविविधतेचे संरक्षण व सर्वसामान्य नागरिक केंद्र बिंदू ठेवून तयार केला गेला पाहिजे असे मत पर्यावरणप्रेमीं मॅकेन्झी डाबरे यांनी सांगितले
एमएमआरडीएची सल्लागार म्हणून नियुक्ती करण्याची मागणी
वसई विरार महापालिकेच्या अधिकाऱ्यांकडून तयार केल्या जाणाऱ्या विकास आराखड्याचे काम अतिशय संथ गतीने सुरू आहे. त्यामुळे या कामात सुसूत्रता आणण्यासाठी आणि ते जलद गतीने व्हावे यासाठी पालिकेने सल्लागार म्हणून एमएमआरडीए प्राधिकरणाची नियुक्ती करावी, अशी मागणी भाजप नगरसेवकांकडून महासभेत करण्यात आली.
