वसई: वसई-विरार शहरातील गाव-पाड्यांची तहान भागविण्यासाठी कामण नदीवर देवकुंडी धरण प्रकल्प तयार करण्याचे नियोजन केले आहे. मात्र या प्रकल्पाचे सर्वेक्षण करण्यासाठी वनविभागा कडून ना हरकत परवानगी अजूनही मिळाली नसल्याने या धरण प्रकल्पाचे सर्वेक्षण रखडले आहे.
वसई पूर्वेच्या भागात कामण, चिंचोटी, सागपाडा, देवदळ, कोल्ही यासह इतर ठिकाणच्या गाव पाड्यात राहणाऱ्या नागरिकांना पाणी समस्येला सामोरे जावे लागत आहे. गावात विहिरी, तलाव, नदी यासारखे जलस्त्रोत आहेत. मात्र ते सुद्धा योग्य रित्या विकसित केलेले नाहीत.त्यामुळे दरवर्षी येथील भागात भीषण पाणी टंचाईची समस्या निर्माण होत असते.
या समस्येवर उपाययोजना करण्यासाठी याच कामण परिसरातील डोंगर दरीतून वाहणाऱ्या देवकुंडी नदीवर धरण किंवा मोठ्या तलावांची निर्मिती करण्यात यावी अशी मागणी करण्यात येत होती. त्यानुसार देवकुंडी नदीवर धरण प्रकल्प प्रस्तावित करण्यात आले आहे. मात्र गेल्या अनेक वर्षांपासून तांत्रिक अडचणी यामुळे हा प्रस्ताव लालफितीत अडकून पडला आहे. ज्या भागात हे धरण उभारण्यात येणार आहे ती जागा तुंगारेश्वर अभयारण्य येत असल्याने त्याठिकाणी सर्वेक्षण करण्यासाठी वनविभाची परवानगी लागणार आहे. या परवानगीसाठी पाटबंधारे विभागाने संजय गांधी राष्ट्रीय विभाग बोरिवली यांच्याकडे मागणी केली आहे.
मात्र अजूनही या धरण प्रकल्पाच्या सर्वेक्षण करण्याच्या कामाला ना हरकत प्रमाणपत्र अजूनही मिळाले नसल्याने आराखडे तयार करण्यास अडचणी येत आहेत असे पाटबंधारे मनोर विभागाचे कार्यकारी अभियंता योगेश पाटील यांनी सांगितले आहे.
आमदारांकडूनही पाठपुरावा
कामण देवकुंडी धरण प्रकल्पाच्या संदर्भात वसईच्या आमदार स्नेहा दुबे-पंडित यांनी जलसंपदा मंत्री गिरीश महाजन यांच्याकडे पाठपुरावा केला आहे. त्यानुसार मंत्री महाजन यांनी या प्रकल्पाची तपासणी करण्याचे निर्देश पालघर पाटबंधारे विभागाला दिले आहेत. त्यानुसार पालघर पाटबंधारे विभागाने वन विभागाशी पत्रव्यवहार करून तांत्रिक सर्वेक्षणाची प्रक्रिया सुरू केली आहे.
कामण देवकुंडी नदीचे सर्वेक्षण करण्यासाठी निधीचे नियोजन ही करून ठेवले आहे. सर्वेक्षण झाल्यानंतर आराखडा तयार केला जाणार आहे. वन विभागाची परवानगी मिळावी यासाठी सातत्याने पाठपुरावा सुरू आहे.
- योगेश पाटील, कार्यकारी अभियंता, पालघर पाटबंधारे विभाग मनोर
