वसई: यंदाच्या दिवाळी सणावर महागाईचे व दुष्काळाचे सावट असले तरी वसई विरारचा बाजार मात्र खरेदीदारांच्या गर्दीने गजबजला आहे. झटपट रांगोळी काढण्याचे साहित्य, नक्षीदार कंदील आणि रंगीबेरंगी पणत्या, पारंपरिक व नव्या नक्षीचे कपडे, फराळाचे सामान, भेटवस्तू अशा विविध प्रकारच्या साहित्याने सध्या शहरातील बाजार सजला आहे.
यंदाच्या वर्षात वाढती महागाई व कमी पर्जन्यमामुळे उद्भवलेली दुष्काळसदृश्य परिस्थिती यामुळे एकंदरीत सामान्य जनतेच्या उत्पन्नावर व खरेदी क्षमतेवर मोठा परिणाम झाला आहे. यामुळे गणेशोत्सव व नवरात्रौत्सवादरम्यान थंडावलेल्या खरेदी-विक्रीच्या व्यवहाराला चालना मिळाल्यामुळे बाजारपेठांमध्ये चैतन्याचे वातावरण पसरले आहे.
दिवाळी सणासाठी अवघा एक आठवडा शिल्लक राहिला आहे. त्यामुळे फराळाच्या साहित्यापासून सजावटीच्या सामनापर्यंत विविध प्रकारच्या खरेदीसाठी वसई विरारमधील मुख्य बाजारपेठांसह, रस्त्याच्याकडेला लावले जाणारे लहान-मोठे स्टॉल, आठवडे बाजारात खरेदीदारांची गर्दी उसळू लागली आहे.
दिवाळी सणात सजावटीचा केंद्रबिंदू असणाऱ्या कंदील खरेदीकडे अनेकांचा कल आहे. तर यावर्षी बाजारात रंगीत धागे, हिरे, विविधरंगी टिकल्या, नक्षीदार पट्ट्या आणि झिरमिळ्यांनी सजलेले कापडी कंदील आकर्षणाचा केंद्रबिंदू ठरले आहेत. अवघ्या ३५० रुपयांपासून ६०० रुपयांपर्यंत विविध आकारात व नक्षीकामांसह उपलब्ध असणाऱ्या कंदिलांच्या खरेदीकडे ग्राहकांचा ओढा जास्त असल्याचे वसईचे कंदीलविक्रेते नवीन शाह यांनी सांगितले. या कंदिलांबरोबरच दुमाडता येण्याजोगे कंदील, अक्रायलीकचे चिनी प्रकारातील लाल रंगाचे कंदील, प्लास्टिक व पुठ्ठ्यापासून तयार करण्यात आलेले कंदीलही बाजारात विक्रीसाठी ठेवण्यात आले आहेत.
दरवर्षीप्रमाणे यंदाही पारंपरिक मातीच्या पणत्यांना मोठी मागणी आहे. मात्र, यासोबतच रंगीबेरंगी मोत्यांच्या पणत्या, जेल कॅण्डल, कुंदन वर्क पणत्या आणि विद्युत पणत्याही बाजारात मोठ्या प्रमाणात उपलब्ध झाल्या आहेत. गेल्या काही वर्षात पणत्या घडवणाऱ्या स्थानिक कारागिरांची संख्या घटल्यामुळे गुजरात, उत्तरप्रदेश या राज्यातून विक्रीसाठी मागवण्यात आलेल्या पणत्या बाजारात मोठ्या संख्येने दिसून येत आहेत. मात्र, पापडी, विरार, नालासोपारा येथे भरणारे आठवडे बाजार मात्र स्थानिक पणती विक्रेत्यांसाठी व कारागिरांसाठी हक्काची बाजारपेठ ठरत असल्याची प्रतिक्रिया विक्रेत्यांनी दिली आहे.
याचबरोबर बाजारात विद्युत रोषणाईसाठी लागणाऱ्या माळा, छोटेसे कंदील, रंगीत बल्ब दिसून येत आहेत. तर सजावटीसाठी रंगीत पडदे, फुलांच्या कृत्रिम माळा, दरवाजावर लावण्यासाठी पारंपरिक विणलेले तोरणे व काही नाजूक मण्यांची तोरणे पहायला मिळत आहेत.
इंस्टंट रांगोळीच्या साहित्यांना महिला वर्गाची पसंती
लाकडी आणि प्लास्टिकचे छोटे-छोटे साचे तसेच संपूर्ण रांगोळीची नक्षी कोरलेला साचा या पारंपारिक रांगोळीच्या साहित्याबरोबर बाजारात इंस्टंट म्हणजेच झटपट रांगोळी काढू शकणाऱ्या रांगोळीच्या साहित्याची महिला वर्गाकडून मोठी खरेदी केली जात आहे. अवघ्या काही मिनिटांत मोठी रांगोळी पूर्ण करणारे रोलर साचे आणि रांगोळी पेनही खरेदीदारांमध्ये लोकप्रिय ठरत आहेत. तसेच ज्यांना रांगोळी काढायला वेळ मिळत नाही, त्यांच्यासाठी रेडिमेट अक्रेलिक व मखमली रांगोळीचे साचे बाजारात आले आहेत.
एक ग्रामचे दागिने व ऑक्सिडाइज्ड दागिने खरेदी
सध्या सोन्याचे दर रोज नवे उच्चांक गाठत आहेत. त्यामुळे खरेदीदारांचा तांबे किंवा पितळ यांसारख्या धातूवर सोन्याचा मुलामा चढवून तयार केलेल्या कृत्रिम दागिन्यांच्या खरेदीकडे असणारा ओढा वाढत आहे. परवडणारे दर आणि अस्सल सोन्याच्या दागिन्यांसारखी चमक यामुळे हे दागिने लोकप्रिय ठरत आहेत. तसेच नवरात्रीदरम्यान चर्चेत असणारे ऑक्सिडाइज्ड दागिनेदेखील इंडो-वेस्टर्न पेहरावासाठी खरेदी केले जात आहेत.
