वसई: वसई-विरार महापालिकेच्या मुख्य रुग्णालयांपैकी एक असलेल्या सर. डि. एम. पेटीट रुग्णालयातील ढिसाळ कारभार पुन्हा एकदा चव्हाट्यावर आला आहे. रुग्णालयात स्त्रीरोग तज्ज्ञ वेळेत उपस्थित राहत नसल्याने उपचारासाठी येणाऱ्या महिला रुग्णांना तासनतास ताटकळत उभे राहावे लागत आहे. यामुळे ग्रामीण तसेच शहरी भागातून येणाऱ्या महिला रुग्णांचे मोठे हाल होत असून, पालिकेच्या आरोग्य यंत्रणेवर संताप व्यक्त केला जात आहे.

वसई पश्चिमेतील वसई गाव या परिसरात वसई विरार महापालिकेचे सर. डि. एम. पेटीट रुग्णालय आहे. हे रुग्णालय मध्यवर्ती भागात असल्यामुळे येथे ग्रामीण भागासह पूर्व पट्ट्यातील महिला मोठ्या संख्येने उपचारासाठी येतात. प्रसूतीपूर्व तपासणी, इतर स्त्रीरोग समस्या आणि उपचारासाठी दररोज सकाळी महिला या रुग्णालयात मोठी गर्दी करतात. मात्र, गेल्या काही दिवसांपासून ठरलेल्या वेळेत डॉक्टर उपलब्ध होत नसल्यामुळे महिला रुग्णांना बराच वेळ रुग्णालयात वाट पाहत राहावे लागत असल्याच्या तक्रारी समोर येत आहेत.

अनेक महिला दुर्गम भागातून किंवा कामावर रजा टाकून येथे येतात. मात्र, दुपारी १-२ वाजेपर्यंत डॉक्टर केबिनमध्ये हजर नसतात, असे रुग्णांच्या नातेवाईकांनी सांगितले. तसेच अनेकदा फक्त रिपोर्ट तपासून घेण्यासाठी आलेल्या महिला तसेच गरोदर मातांची मोठी गैरसोय होते. तर पालिकेच्या रुग्णालयात कमी दरात उपचार मिळतील या आशेने येणाऱ्या गोरगरीब रुग्णांना डॉक्टरांच्या अनुपस्थितीमुळे अखेर खाजगी दवाखान्यांची वाट धरावी लागत असल्याची तक्रार देखील काहींनी केली आहे.

या संदर्भात रुग्णालय प्रशासनाशी संपर्क साधला असता, तांत्रिक कारणे किंवा शस्त्रक्रियेमुळे काहीवेळा डॉक्टरांना येण्यास उशीर होतो, असे रुग्णालयाच्या वैद्यकीय अधीक्षक डॉ. रानी बदलानी यांनी सांगितले आहे. तसेच डॉक्टरांना वारंवार येण्यासाठी उशीर होत असेल तर याबाबत त्यांच्याशी चर्चा केली जाईल असेही त्यांनी सांगितले आहे.