वसई: भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची १३५ वी जयंती मंगळवारी मोठ्या उत्साहात वसई विरार शहरात साजरी करण्यात आली. जयंतीनिमित्त शहरात विविध कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. तसेच विद्युत रोषणाई करून आणि मिरवणुका काढत मोठ्या जल्लोषात जयंती साजरी करण्यात आली.

दरवर्षी १४ एप्रिल रोजी देशभरात मोठ्या उत्साहात डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची जयंती साजरी केली जाते.भारतीय संविधानाचे शिल्पकार म्हणून ओळखले जाणारे डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी अस्पृश्यता निर्मूलन, दलितांच्या हक्कांसाठी लढा आणि समाजात समानतेची भावना निर्माण आयुष्यभर संघर्ष केला. सामाजिक समता, न्याय आणि शिक्षणाचा प्रसार यासाठी ही त्यांनी मोठे योगदान दिले आहे.त्यांच्या जयंतीनिमित्त त्यांच्या शिकवणींचे स्मरण करून समाजात समता आणि बंधुतेचा संदेश दिला जातो.

वसई विरार शहरातही डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची जयंती साजरी करण्यात आली. वसई विरार महापालिका मुख्यालयात तसेच सर्व प्रभाग समिती कार्यालयांमध्ये भारतरत्न डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांना अभिवादन करून जयंती साजरी करण्यात आली. भारतरत्न डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेला महापौर अजीव पाटील यांनी पुष्पहार अर्पण करून अभिवादन केले. यावेळी उपमहापौर .मार्शल लोपीस, आयुक्त पृथ्वीराज बी.पी. आणि नगरसेवक आणि महापालिकेतील इतर सर्व कर्मचारी उपस्थित होते.

महापालिकेप्रमाणे तहसील कार्यालय, ग्रामपंचायत कार्यालये व इतर शासकीय कार्यालयात ही डॉ बाबासाहेबांना अभिवादन करण्यात आले. तसेच शहरातील विवीध समाजसेवी संस्था आणि राजकीय पक्षांकडून बुध्द वंदना, व्याख्यान, मिरवणूक सोहळा, सत्कार समारंभ व सांस्कृतिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले होते. तसेच नालासोपाऱ्यात डॉ. बाबासाहेब आंबेडकरांचा पुतळा, पंचशील कमान आणि बौद्ध स्तूपाच्या परिसरात आकर्षक सजावट करण्यात आली होती. कार्यक्रमस्थळी व मिरवणुकी दरम्यान कोणत्याही प्रकारचा अनुचित प्रकार घडू नये यासाठी पोलिसांनी कडेकोट बंदोबस्त ठेवला होता.

कलाकाराचे अनोखे अभिवादन

वसईतील चित्रकार कौशिक दिलीप जाधव यांनी चवदार तळ्यातील एका दगडावर वॉटर कलरच्या सहाय्याने अवघ्या अर्ध्या तासात डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचे चित्र रेखाटलेले होते. महाडच्या चवदार तळ्याचा सत्याग्रह हा डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी अस्पृश्यता निवारण आणि मानवी हक्कांसाठी उभारलेला एक ऐतिहासिक लढा होता. या लढ्याची आठवण करून देण्याच्या उद्देशातून त्यांनी हे चित्र रेखाटले. .