वसई:- वसई विरार शहरात पावसाळ्यात पूरस्थितीची समस्या निर्माण होऊ नये यासाठी महापालिकेकडून नालेसफाईचे काम सुरू केले आहे. आतापर्यंत ६० टक्के नालेसफाईचे काम पूर्ण झाले असून नाल्यातून ४९ हजार ७४२ घनमीटर इतका गाळ उपसा करण्यात आला असल्याचा दावा महापालिकेने केला आहे. असे जरी असले तरी शहरात अजूनही अनेक ठिकाणच्या भागात नालेसफाईचे काम अपूर्णच असल्याचे चित्र दिसून येत आहे.

वसई विरार शहराचे झपाट्याने नागरीकरण होऊ लागले आहे. यातच उभारण्यात आलेली बेकायदा बांधकामे, माती भराव, विकासाच्या नावाखाली बुजविण्यात आलेले नैसर्गिक नाले यामुळे मागील काही वर्षांपासून वसई विरारकरांना पूरस्थितीच्या समस्येला तोंड द्यावे लागत आहेत. पावसाळा आता तोंडावर येऊन ठेपला आहे. याच अनुषंगाने वसई विरार महापालिकेने शहरात नालेसफाईचे काम सुरू केले आहे.

शहरात एकूण २०६ नाले असून त्यांची लांबी सुमारे १९१.२१ किलोमीटर इतकी आहे. या नाल्यांच्या सफाईचे काम १५ एप्रिलपासून सुरू आहे. या नालेसफाईवर १८ कोटीं रुपये निधी खर्च केला जाणार आहे. शहरातील २०६ पैकी ७१ नाल्यांचे स्वच्छता झाली आहे तर ६४ नाल्यांची सफाईचे काम सुरू आहे. आतापर्यंत जवळपास ६० टक्के नालेसफाईचे काम पूर्ण झाले असल्याची माहिती घनकचरा व्यवस्थापन विभागाचे सहायक आयुक्त जितेंद्र नाईक यांनी दिली आहे.

४९ हजार घनमीटर गाळाची विल्हेवाट

नाले साफसफाईसाठी २८ लॉगबुम, २५ शॉटबुम पोकलेन, २५ जेसीबी, ०२ ड्रेनमास्टर व गाळ वाहून नेण्यासाठी ३८ डंपर वाहनांचा वापर केला जात आहे. आतापर्यंत ४९ हजार ७४२ घनमीटर इतका गाळ उपसा करण्यात आला असून त्याची विल्हेवाट लावण्याचे काम सुरू आहे.

अनेक ठिकाणी नाल्यात कचरा कायम

महापालिकेने पावसाळ्याच्या तोंडावर नालेसफाई सुरू केली असली तर अनेक ठिकाणच्या भागात नाल्यात प्लास्टिकसह अन्य कचरा मोठ्या प्रमाणात साचल्याचे चित्र दिसून येत आहे. यात नालासोपारा पूर्व, नायगाव, धानिव बाग, सातीवली, गास सनसिटी रस्त्याजवळील नाले, वालीव, चिंचोटी व अन्य भागांचा समावेश आहे. त्यामुळे येथील नालेसफाई महापालिकेने नियोजित केलेल्या वेळेत पूर्ण होईल किंवा नाही याबाबत ही प्रश्न उपस्थित केले जात आहेत. मागील वर्षी सुद्धा वसईत पूरस्थिती निर्माण झाली होती. त्यावेळी पूर्व – पश्चिम अशा दोन्ही ठिकाणच्या भागाला फटका बसला होता. त्या घटनेची पुनरावृत्ती होऊ नये यासाठी सर्व ठिकाणी योग्य पाहणी करून नालेसफाईचे काम पूर्ण करावे अशी मागणी नागरिक करीत आहेत.