वसई : वसई विरार महापालिकेच्या वसई भोयदापाडा येथील कचराभूमीला रविवारी रात्रीच्या सुमारास अचानक पणे भीषण आग लागल्याची घटना घडली. या लागलेल्या आगीमुळे आजूबाजूच्या परीसरात धुराचे लोट पसरल्याने नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले होते.
वसई पूर्वेतील गोखीवरे येथील भोयदापाडा पालिकेची कचरा भूमी आहे. जवळपास ४० एकर जागेत ही कचरा भूमी विस्तारली आहे. शहराच्या वाढत्या नागरीकरण यामुळे कचऱ्याची समस्या ही अधिक जटिल बनली आहे.दररोज कचराभूमीवर साडेआठशे टनाहून अधिक कचरा गोळा करून आणून टाकला जात आहे. महापालिकेची कचरा विल्हेवाट प्रक्रिया ठप्प असल्याने कचरा भूमीवर कचऱ्याचे डोंगर तयार होऊ लागले आहेत.
कचरा भूमीवर साचलेल्या कचऱ्यात रासायनिक वायू तयार होऊन आगी लागण्याच्या घटना घडतात. रविवारी रात्री साडेदहा च्या सुमारास अचानकपणे कचरा भूमीला आग लागल्याची घटना घडली. या आगीचा धूर हवेद्वारे आजूबाजूच्या परीसरात पसरल्याने सर्वत्र धुराचे वातावरण निर्माण झाले होते. या घटनेची माहिती मिळताच महापालिकेच्या अग्निशमन विभागाने घटनास्थळी धाव घेत आगीवर नियंत्रण मिळविले.
सातत्याने असे प्रकार सुरू असल्याने येथील नागरिकांना याचा त्रास सहन करावा लागतो. या आगीचा धूर हवेद्वारे आजूबाजूच्या परिसरात पसरत असल्याने प्रदूषण निर्माण होते काही वेळा ही आग धुमसत असते त्यामुळे धुराचा मोठा त्रास जाणवत असल्याचे नागरिकांचे म्हणणे आहे.
