वसई: वसई-विरार महापालिकेची घनकचरा व्यवस्थापन यंत्रणा पूर्णपणे कोलमडली असून शहरातील कचऱ्याचा प्रश्न ऐरणीवर आला आहे. महापालिकेचा बायोमायनिंग प्रकल्प गेल्या वर्षभरापासून ठप्प झाल्यामुळे आणि दैनंदिन जमा होणाऱ्या कचऱ्यासाठी जागा शिल्लक न राहिल्यामुळे, क्षेपणभूमीवर कचऱ्याचे अवाढव्य डोंगर उभे राहिले आहेत.

वसई-विरार शहरातून दररोज तब्बल १ हजार ते बाराशे मेट्रिक टन कचरा गोळा केला जातो. हा संपूर्ण कचरा वसई पूर्वेतील गोखीवरे, भोयदापाडा येथील कचरा भूमीवर (डम्पिंग ग्राऊंड) टाकला जातो. नियमानुसार या कचऱ्याचे योग्य वर्गीकरण करून त्याची विल्हेवाट लावणे बंधनकारक आहे; मात्र बायोमायनिंग प्रकल्प बंद असल्याने कचऱ्याचे ढीग साचून त्याचा थेट परिणाम परिसरातील नागरिकांच्या जीवनमानावर होत आहे.

भोयदापाडा, गोखिवरे तसेच वसई पूर्वेतील नागरिक कचऱ्याच्या समस्येमुळे त्रस्त झाले आहेत. साचलेल्या कचऱ्यामुळे पसरणारी तीव्र दुर्गंधी, कचऱ्याला सतत लागणाऱ्या आगींमुळे पसरणारा विषारी धूर, पावसाळ्यात नागरी वस्त्यांमध्ये वाहून येणारे सांडपाणी, यामुळे या परिसरातील रहिवाशांच्या आरोग्याचा प्रश्न निर्माण झाला आहे. या गंभीर परिस्थितीवर शिवसेनेचे (ठाकरे गट) तालुकाप्रमुख काकासाहेब मोटे यांनी तीव्र संताप व्यक्त करत, प्रशासनाकडे तातडीने उपाययोजना करण्याची मागणी केली आहे.

कचरा साठवण्यासाठी एकीकडे क्षेपणाभूमीची जागा अपुरी पडत असताना, आता नालासोपाऱ्यातील अग्रवाल नगर, सनसिटी, श्रीप्रस्थ रस्ता, महामार्ग आणि रिद्धी विनायक रुग्णालयाकडे जाणाऱ्या मार्गावरील मोकळ्या जागा व रस्त्यांच्याकडेला कचऱ्याचे साम्राज्य निर्माण झाले आहे. त्यामुळे महापालिका घनकचरा व्यवस्थापनात सपशेल अपयशी ठरल्याचा थेट आरोप नागरिक करत आहेत.

पुन्हा प्रकल्प कार्यान्वित होणार

कचराभूमीवर पूर्वी १५ लाख मेट्रिक टन कचरा साचलेला होता. त्यापैकी गेल्या दोन वर्षांत केवळ ५ लाख मेट्रिक टन कचऱ्यावर प्रक्रिया होऊ शकली, तर याच काळात नवीन ५ लाख मेट्रिक टन कचऱ्याची भर पडली आहे. आता बायोमायनिंगचे काम पुन्हा वेगाने सुरू करण्यासाठी नवीन ठेकेदाराची नियुक्ती करण्यात येत असून हा प्रकल्प लवकरच पूर्ववत सुरू केला जाईल, असे घनकचरा व्यवस्थापन विभागाचे सहायक आयुक्त जितेंद्र नाईक यांनी सांगितले.

उघड्यावर कचरा जाळण्याचे प्रकार सुरूच

सार्वजनिक ठिकाणी नागरिकांनी कचरा टाकू नये किंवा तो जाळू नये यासाठी वसई विरार महापालिकेकडून क्लीन-अप मार्शलची नियुक्ती करण्यात आली आहे. मात्र त्यानंतरही रस्त्याच्याकडेला गोळा होणार कचऱ्याला आगी लावल्या जात असल्याचे प्रकार वारंवार समोरी येत असतात. यामुळे शहरातील हवा गुणवत्तेवर देखील परिणाम होत आहे.

घाऊक कचरा निर्मात्यांसाठी नवे नियम

प्रतिदिन १०० किलो किंवा त्यापेक्षा जास्त कचरा निर्माण करणाऱ्या घाऊक कचरा निर्मात्यांसाठी वसई विरार महापालिकेने नवे नियम लागू केले आहेत. यात ५० पेक्षा जास्त सदनिका असलेल्या गृहनिर्माण संस्था, उपाहारगृहे, रुग्णालये, मॉल, शैक्षणिक संस्था, विवाह/संमेलन सभागृहे, कारखाने, इत्यादींचा समावेश असणार आहे. नव्या नियमांनुसार संस्थेकडून तयार होणाऱ्या कचऱ्याच्या वर्गीकरणापासून विल्हेवाटीपर्यंत संपूर्ण जबाबदारी घाऊक कचरा निर्मात्यांना घ्यावी लागणार असून यासाठी ३० ऑगस्टपर्यंत मुदत देण्यात आली आहे. तसेच नियमांची अंमलबजावणी करण्यात दिरंगाई करणाऱ्या आस्थापनांविरोधात मुदत संपल्यानंतर दंडात्मक कारवाई केली जाणार असल्याचे पालिकेकडून स्पष्ट करण्यात आले आहे.