वसई: वसई-विरार शहर महानगरपालिकेच्या परिवहन सेवेचा विस्तार करण्यासाठी केंद्र सरकारच्या ‘पंतप्रधान अनुदान योजने’तून १०० नव्या ई-बसेस मंजूर झाल्या आहेत. मात्र, या बसेससाठी उभारण्यात येणाऱ्या नवघर आणि नालासोपारा येथील अत्याधुनिक आगारांची कामे निधीअभावी रखडली आहेत. या प्रकल्पाचे जवळपास ८० टक्के काम पूर्ण झाले असले, तरी राज्य शासनाकडून अद्याप ९ कोटी रुपयांचा उर्वरित निधी न मिळाल्याने पुढील कामाला ब्रेक लागला आहे.

​वसई-विरार शहराचे झपाट्याने होत असलेले नागरीकरण लक्षात घेता, सध्याची परिवहन सेवा अपुरी पडत आहे. सद्यस्थितीत पालिकेच्या ताफ्यात १२० बसेस असून, त्यांच्या माध्यमातून ३६ मार्गांवर सेवा दिली जाते. या बसेसमधून दररोज ६० ते ६५ हजार प्रवासी प्रवास करतात. प्रवाशांची वाढती संख्या आणि वाहतुकीची कोंडी लक्षात घेता परिवहन सेवेच्या बसेसची संख्या वाढविण्यावर भर दिला जात आहे.

केंद्र शासनाच्या पंतप्रधान अनुदान योजनेतून आणखीन १०० ई बस उपलब्ध करून दिल्या जाणार आहेत.​नव्याने येणाऱ्या १०० ई-बसेस उभ्या करण्यासाठी आणि त्यांच्या चार्जिंगसाठी पालिकेने नवघर व नालासोपारा येथे दोन नवीन आगार आणि ‘चार्जिंग स्विचिंग स्टेशन्स’ उभारण्याचे काम हाती घेतले आहे.

यासाठी शासनाकडून २७.१७ कोटी इतका निधी तर महापालिकेचा १० कोटी असा एकूण ३७.१७ कोटी निधी खर्च केला जाणार आहे. शासनाकडून १८.५७ कोटी रुपये निधी उपलब्ध झाला आहे. मात्र उर्वरित निधी उपलब्ध होत नसल्याने कामाला गती मिळू शकली नाही. सद्यस्थितीत दोन्ही आगारांची टक्क्यांहून अधिक काम पूर्ण झाली आहेत  मात्र उर्वरित काम करण्यासाठी शासनाकडून निधी उपलब्ध होणे आवश्यक आहे. तिथून निधी मिळाल्यानंतर आगारांची कामे मार्गी लागतील अशी माहिती परिवहन विभागाने दिली आहे.

अशी आहे आगारांची क्षमता

​नालासोपारा आगार: १.१२ एकर क्षेत्रफळ (क्षमता: ४० बसेस)

​नवघर आगार: १.२५ एकर क्षेत्रफळ (क्षमता: ६० बसेस)

“आगारांच्या कामासाठी शासनाकडून २७ कोटी रुपये मंजूर आहेत. त्यापैकी आतापर्यंत १८.५७ कोटी रुपये मिळाले असून उर्वरित निधी मिळवण्यासाठी आमचे सातत्याने प्रयत्न सुरू आहेत. शासनाकडून निधी उपलब्ध होताच आगारांची रखडलेली कामे तातडीने मार्गी लावली जातील.”:-धैयशील जाधव  (परिवहन व्यवस्थापक, वसई-विरार महानगरपालिका)