वसई: मागील काही वर्षांत पावसाळ्यात आणि वादळी वाऱ्यांमुळे किनारपट्टीसह पश्चिम पट्ट्यात कोलमडणारी वीज यंत्रणा आता सुरळीत होणार आहे. या समस्येवर कायमस्वरूपी मात करण्यासाठी महावितरणने ‘आपत्ती सौम्यीकरण योजनेतून’ वसईतील १५ हून अधिक गावांत विद्युत पायाभूत सुविधांचे बळकटीकरण हाती घेतले आहे. यासाठी तब्बल २११ कोटी ५४ लाखांचे नियोजन करण्यात आले असून, या कामांचे कार्यादेश नुकतेच जारी करण्यात आले आहेत. एक ते दीड वर्षात ही कामे मार्गी लावली जाणार आहेत.

​वसई-विरार शहरात महावितरणकडून वीज पुरवठा केला जात असून, वाढत्या लोकसंख्येमुळे सध्या ११ लाख १५ हजार ग्राहकांना वीज पुरवठा केला जात आहे. मात्र, जुन्या आणि लोखंडी खांबांवर वाढलेल्या भारामुळे विद्युत वाहक तारा लोंबकळत असल्याचे चित्र सर्वत्र दिसते. हवेच्या तीव्र वेगाने किंवा अतिउच्च दाबाने या तारा एकमेकांना स्पर्श होऊन आगीच्या ठिणग्या पडणे आणि वीज पुरवठा खंडित होणे हे प्रकार नित्याचेच झाले आहेत.

विशेषतः, किनारपट्टीच्या भागाला याचा मोठा फटका बसतो. तौक्ते यांसारख्या चक्रीवादळांच्या वेळी या भागाची अक्षरशः दैना उडते. वीज वाहिन्यांवर झाडे कोसळणे, खांब व तारा तुटणे यांसारख्या समस्यांमुळे एकदा वीज गेली की ती पूर्ववत होण्यासाठी तीन ते चार दिवस लागायचे, ज्यामुळे नागरिकांचे प्रचंड हाल होत असत. यावर कायमस्वरूपी उपाय म्हणून वीज वाहिन्या भूमिगत करण्याची मागणी नागरिक, लोकप्रतिनिधी आणि सामाजिक कार्यकर्त्यांकडून सातत्याने केली जात होती.

​याच पार्श्वभूमीवर महावितरणने नैसर्गिक आपत्ती सौम्यीकरण योजनेतून उपाययोजना करण्याचा निर्णय घेतला आहे. या योजनेंतर्गत वसई-विरार पश्चिम पट्ट्यातील अर्नाळा, कळंब, निर्मळ, आगाशी, उमराळे, तरखड, रानगाव, सांडोर, कौलार,गिरीज, वासलई, पाचूबंदर, मारंबळपाडा, चिखलडोंगरी, पाणजू व इतर अशा १५ हून अधिक गावांच्या ठिकाणी उपाययोजना केल्या जाणार असून यासाठी २११.५४ कोटींचा निधी खर्च केला जाणार आहे अशी माहिती महावितरणने दिली आहे.या सर्व कामांमुळे पावसाळ्यात किंवा नैसर्गिक आपत्तीच्या काळात वीजपुरवठा खंडित होण्याचे प्रमाण रोखता येणार असून, नागरिकांना सुरळीत वीजपुरवठा करण्यास मोठी मदत होणार आहे.

उपाययोजना काय ?

  • नवीन २२ केव्ही भूमिगत १६४ किलोमीटर वीज वाहिन्या अंथरणे
  • २३५ किलोमीटर लघुदाब भूमिगत वीजवाहिन्यांची उभारणी
    ​- नवीन वितरण रोहित्रे बसवणे.
  • रिंग मेन युनिट ३६३
  • फिडर पिलर १९७६
  • एस एम सी बॉक्स २१०४
  • आवश्यक विद्युत केबल्स व यंत्रणेची सुधारणा. रस्ते खोदकाम आणि प्रशासकीय परवानग्या

​वीज वाहिन्या भूमिगत करण्यासाठी मोठ्या प्रमाणावर रस्ते खोदकाम करावे लागणार आहे. ही कामे सुरळीत पार पाडण्यासाठी संबंधित ग्रामपंचायती आणि महानगरपालिका यांच्याकडून रस्ते खोदकाम व त्यानंतर रस्ते पूर्ववत करण्यासाठी आवश्यक असलेल्या परवानग्या मिळवण्याची प्रक्रिया सध्या सुरू आहे. प्रशासकीय परवानग्या मिळताच ही कामे तातडीने सुरू केली जाणार आहेत असे महावितरणच्या अधिकाऱ्याने सांगितले.

वसई विरारच्या पश्चिम व किनार पट्टीच्या भागात विद्युत पायाभूत सुविधांचे बळकटीकरणाचे कामाचे नियोजन केले आहे. या कामाचे कार्यादेश दिले आहेत. त्याकामासाठी स्थानिक स्वराज्य संस्थेच्या आवश्यक परवानग्या घेऊन या कामाला सुरुवात होईल.- राजेंद्र आव्हाड, प्रभारी मुख्य अभियंता कल्याण परिमंडळ