​वसई :- वसई-विरार शहरात आग दुर्घटनांचे सत्र सुरूच असून, अवघ्या आठ तासांच्या कालावधीत विरार, नालासोपारा आणि वालीव येथे आगीच्या तीन वेगवेगळ्या घटना घडल्या. या दुर्दैवी घटनांमुळे शहरात एकच खळबळ उडाली असून नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. सुदैवाने, या तिन्ही दुर्घटनांमध्ये कोणतीही जीवितहानी झाली नसली तरी मोठ्या प्रमाणात संपत्ती आणि माल जळून खाक झाला आहे.

​पहिली घटना शनिवारी रात्री साडेअकरा वाजण्याच्या सुमारास नालासोपारा पूर्वेकडील वाकणपाडा परिसरातील राम इंडस्ट्रियल हबमधील चौधरी कंपाउंड येथे घडली. येथील एका परफ्यूम आणि कॉस्मेटिक कंपनीला अचानक भीषण आग लागली. आग इतकी भयानक होती की, त्यावर नियंत्रण मिळवण्यासाठी तब्बल पाच अग्निशमन गाड्या आणि सात पाण्याच्या टँकरला पाचारण करावे लागले. अग्निशमन जवानांच्या अथक परिश्रमांनंतर सुमारे सहा तासांनी या आगीवर पूर्णपणे नियंत्रण मिळवण्यात यश आले.

​दुसरी घटना रविवारी पहाटे पाच वाजण्याच्या सुमारास विरार पश्चिमेकडील ग्लोबल सिटी परिसरातील एम. एव्हेन्यू येथे घडली. या परिसरातील पाच ते सहा व्यावसायिक गाळ्यांना आगीने आपल्या तडाख्यात घेतले. अग्निशमन दलाच्या जवानांनी तात्काळ घटनास्थळी धाव घेत शर्थीचे प्रयत्न करून आग आटोक्यात आणली.

​तिसरी घटना याच दरम्यान वसई पूर्व येथील वालीव रोडवरील नीलम बिझनेस सेंटर आणि वरुण इंडस्ट्रीजजवळील एस.एम. स्टीलच्या दोन गाळ्यांमध्ये घडली. या दोन्ही गाळ्यांना अचानक आग लागल्याने परिसरात काही काळ तणावाचे वातावरण होते. मात्र, अग्निशमन दलाच्या तत्परतेमुळे येथील आगही वेळीच आटोक्यात आणण्यात आली आणि पुढील अनर्थ टळला. ​दरम्यान, अवघ्या आठ तासांत एकापाठोपाठ एक घडलेल्या या तीन आगीच्या घटनांमागील नेमके कारण अद्याप अस्पष्ट आहे. प्राथमिक अंदाजानुसार, शॉट सर्किटमुळे या दुर्घटना घडल्या असाव्यात, अशी शक्यता वर्तवली जात आहे. वारंवार घडणाऱ्या अशा औद्योगिक आणि व्यावसायिक आगींच्या घटनांमुळे स्थानिक नागरिकांमध्ये सुरक्षेचा मोठा प्रश्न निर्माण झाला आहे.