वसई: वसई विरार महापालिकेकडून फटाके विक्रीसाठी ४२ ठिकाणांची निवड करण्यात आली आहे. यात खाजगी व पालिकेच्या मोकळ्या मैदानांचा समावेश असून प्रभाग समिती ए मध्ये सर्वाधिक जागांना मंजुरी देण्यात आली आहे.

दिवाळीच्या अवघ्या काही दिवसांवर येऊन ठेपला असताना वसई विरार शहरातील बाजारपेठा पणत्या, रांगोळी, आकाशकंदील आणि सजावटीच्या साहित्याने सजू लागल्या आहेत. तर दुसरीकडे विविध प्रकारचे फटाके घेण्यासाठीही खरेदीदार बाजारात गर्दी करत आहेत. मात्र, फटाक्यांच्या खरेदीसाठी होणारी गर्दी आणि सुरक्षेचा प्रश्न विचारात घेऊन वसई विरार महापालिकेने फटाके विक्रीसाठी शहरातील अधिकृत ४२ ठिकाणांची यादी जाहीर केली आहे.

मुख्यत्वे मोकळी मैदाने व कमी दाटीवाटीच्या जागांची स्टॉल उभारणीसाठी निवड करण्यात आली आहे. यात पालिकेच्या मैदानांसह २५ १७ खाजगी मैदाने व मोकळ्या जागांचा समावेश आहे. तर प्रभागनिहाय पाहिल्यास पालिकेच्या प्रभाग समिती ‘ए’ (बोळींज) क्षेत्रात सर्वाधिक १५ जागांना मंजुरी देण्यात आली आहे. तर प्रभाग समिती ‘आय’ (वसई) व प्रभाग समिती ‘डी’ (आचोळे) येथे प्रत्येकी एका ठिकाणाची निवड स्टॉल उभारणीसाठी करण्यात आली आहे.

नागरिकांच्या सुरक्षिततेच्या दृष्टीने आणि कोणत्याही प्रकारची दुर्घटना टाळण्यासाठी अग्निशमन नियमांचे पालन करूनच या ठराविक ठिकाणी तात्पुरते स्टॉल्स उभारण्यास परवानगी दिली जाणार आहे. सुरक्षेच्या नियमांचे उल्लंघन करणाऱ्या तसेच दाटीवाटीच्या ठिकाणी अनधिकृतपणे फटाके विकणाऱ्यांवर कडक कारवाईचा इशारा प्रशासनाकडून देण्यात आला आहे.

प्रभाग समितीनुसार मंजूर ठिकाणांची संख्या:

प्रभाग समिती ‘ए’ (बोळींज): १५ ठिकाणे
प्रभाग समिती ‘बी’ (नालासोपारा पूर्व): ५ ठिकाणे
प्रभाग समिती ‘सी’ (चंदनसार): ५ ठिकाणे
प्रभाग समिती ‘डी’ (आचोळे): १ ठिकाण
प्रभाग समिती ‘ई’ (श्रीप्रस्था): ५ ठिकाणे
प्रभाग समिती ‘जी’ (वालीव): ३ ठिकाणे
प्रभाग समिती ‘एच’ (नवघर-माणिकपूर): ७ ठिकाणे
प्रभाग समिती ‘आय’ (वसई): १ ठिकाण