वसई: पावसाळ्यात निर्माण होणाऱ्या वादळी वाऱ्यांपासून मच्छीमारांचे संरक्षण करण्यासाठी आणि समुद्रातील मत्स्य प्रजातींच्या प्रजोत्पादनास पोषक वातावरण मिळावे या हेतूने राज्याच्या सागरी क्षेत्रात पुढील दोन महिने मासेमारी करण्यास बंदी घालण्यात आली आहे. त्यामुळे वसई विरारच्या किनार पट्टीवरील ६३६ इतक्या बोटी किनाऱ्यावर आल्या आहेत.

वसई विरारच्या किनार पट्टीच्या भागात  मोठ्या संख्येने मच्छिमार बांधव हे मासेमारीचा व्यवसाय करतात. विशेषतः अर्नाळा, पाचबंदर, नायगाव, कोळीवाडा, किल्लाबंदर अशा विविध ठिकाणच्या भागातील मच्छीमार बांधव मासेमारीचा व्यवसाय करतात. सहाशेहून अधिक मासेमारीसाठी जाणाऱ्या परवाना धारक बोटी आहेत.

मात्र आता पावसाळ्याच्या तोंडावर मत्स्यव्यवसाय विभागाने १ जून ते ३१ जुलै या कालावधीत मासेमारी बंद ठेवण्याचे आदेश दिले होते.  त्यानुसार समुद्रात गेलेल्या मच्छीमारांना १ जूनपूर्वीच आपल्या बोटी किनाऱ्यावर आणण्याच्या सूचना दिल्या होत्या. त्यामुळे वसई विरारच्या किनार पट्टीवरील मच्छीमारांनी ही आपल्या बोटी समुद्र किनाऱ्यावर आणल्या आहेत. जवळपास ६३६ इतक्या मासेमारी बोटी किनाऱ्यावर आणल्या असल्याची माहिती परवाना विभागाने दिली आहे.

मासेमारी बंदी ही दोन महिन्यांसाठी केली आहे. या काळात ही काही मच्छीमार बांधव छुप्या मार्गाने, पर्ससीन नेट द्वारे बेकायदेशीर मासेमारी करण्याचा प्रयत्न करीत असतात. त्याचा फटका पारंपारिक मासेमारी करणाऱ्या मच्छिमारांना बसतो. यासाठी मासेबंदीची काटेकोरपणे अंमलबजावणी करण्यात यावी अशी मागणी महाराष्ट्र प्रदेश फिशरमन काँग्रेसचे मुख्य समन्वयक मिल्टन सौदीया यांनी मत्स्यव्यवसाय आयुक्तांकडे केली आहे.

पावसाळ्याच्या तोंडावर साहित्याची आवरा आवर

पावसाळ्यात या बोटींना कोणत्याही प्रकारचे नुकसान होऊ नये व त्यामध्ये असलेले साहित्य ही सुरक्षित राहावे यासाठी स्वच्छ धुवून बांधून ठेवल्या जातात. मच्छिमारांनी आपले सर्व साहित्य धुवून स्वच्छता नीटनेटके करून ठेवण्यास सुरवात केली आहे. आता पावसाळ्यात नारळी पौर्णिमे शिवाय या बोटी समुद्रात जाणार नाही. यासाठी वसईतील अर्नाळा, नायगाव, पाचूबंदर यासह विविध ठिकाणच्या समुद्र किनाऱ्यावर माश्यांच्या जाळ्यांची स्वच्छता , मोठं मोठे दोरखंड, व इतर साहित्य स्वच्छ करून घरच्या गोदामामध्ये नेऊन ठेवण्यास सुरवात केली असल्याची माहिती मच्छिमारांनी दिली आहे.

मत्स्य उत्पादनात घट

एकापाठोपाठ येणारी वादळे, खराब हवामान आणि त्यामुळे पाण्याच्या अंतर्गत प्रवाहांमध्ये होणारे बदल तसेच अवकाळी पाऊस यासारख्या नैसर्गिक आपत्तींमुळे मासेमारी करण्यास बाधा येते. पूर्ण क्षमतेने मासेमारी होत नाही. वादळी वारे आल्यास काही वेळा अर्ध्यावरूनच परत यावे लागते त्यामुळे लाखोंचे डिझेल घालवून ही काही उपयोग होत नाही. अशा विविध प्रकारच्या कारणामुळे मत्स्य उत्पादन घटत असल्याची प्रतिक्रिया मच्छिमारांनी दिली आहे.