वसई: वसई विरारमधील पाणी निचरा होणाऱ्या खाड्यांमध्ये मोठ्या प्रमाणात कांदळवन तयार झाले आहे. त्यामुळे पाणी जाण्याचा मार्ग अरुंद झाला असून पाणी निचरा होण्यात अडथळे निर्माण होतात आणि त्यामुळे शहरात पूरस्थिती निर्माण होते. ही समस्या दूर करण्यासाठी पावसाळी पाण्याचा निचरा होणाऱ्या नैसर्गिक मार्गातील कांदळवने (मॅग्रोव्ह) स्थळांची पाहणी करून नियमानुसार खाडीत स्थलांतरीत करावीत असे निर्देश वनमंत्री गणेश नाईक यांनी दिले आहेत.

वसई विरार शहरात विविध ठिकाणच्या भागात पाण्याचा निचरा होण्यासाठी नैसर्गिक खाड्या आहेत. याच खाड्यांमधून शहरातील पावसाच्या पडणाऱ्या पाण्याचा निचरा होत असतो. मात्र, मागील काही वर्षांपासून खाड्यांमध्ये मोठ्या प्रमाणात कांदळवने वाढली आहेत. त्यामुळे पावसाचे पाणी वाहून जाण्याच्या मार्गात अडथळे निर्माण होऊन शहरात पूरस्थिती सारखी समस्या निर्माण होत आहे. याचा मोठा फटका जनतेला बसून अनेकांचे आर्थिक नुकसान होत असते.

ही पूरस्थितीची समस्या सुटावी व यापुढे पूरस्थिती निर्माण होऊ नये यासाठी पालिकेने राष्ट्रीय पर्यावरण अभियांत्रिकी संशोधन संस्था (निरी), भारतीय तंत्रज्ञान संस्था (आयआयटी) या सत्यशोधन समित्यांची नियुक्ती केली होती. त्यांनी दिलेल्या अहवालात पावसाळी पाण्याचा निचरा होणाऱ्या नैसर्गिक नाल्यात सांडपाण्यामुळे कांदळवने व इतर वनस्पतींची वाढ होऊन त्यामुळे नाल्यांची वहन क्षमता कमी झाली असल्याचे तसेच उच्च भरती व अतिवृष्टीच्या काळात जलमार्गात बॅकवॉटर इफेक्ट निर्माण होऊन पूरस्थिती निर्माण होत असल्याचे अहवालात त्यांच्या म्हटले होते.

मात्र, अजूनही या अहवालाची राज्य सरकार व महापालिकेकडून अंमलबजावणी झालेली नाही. नुकत्याच पार पडलेल्या जिल्हा नियोजन समितीच्या बैठकीत ही याबाबत प्रश्न उपस्थित करण्यात आला होता.वसई विरारमधील पूरस्थिती नियंत्रणाच्या दृष्टीने वनमंत्री तथा पालघरचे पालकमंत्री गणेश नाईक यांनी मंगळवारी सह्याद्री अतिथीगृहात बैठक घेतली.

या बैठकीला आमदार राजन नाईक, आमदार स्नेहा दुबे यांच्यासह वन विभाग आणि महापालिकेचे वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते.पावसाळी पाण्याचा निचरा करणाऱ्या चिखलडोंगरी परिसर, नारंगी फाटक ते रेती बंदर, कल्व्हर्ट क्र. ७८ ते वसई खाडी आणि उमेळा फाटा ते वसई खाडीपर्यंतच्या नाल्याची सध्या ४० ते ५० टक्क्यांपर्यंत रुंदी झाली आहे.

त्यामुळे पूरनियंत्रणासाठी जलमार्गात वाढलेले कांदळवन व इतर वनस्पती नियोजनबद्धरित्या स्थलांतरित करण्याची शिफारस `सीएसआयआर-नीरी, आयआयटी-मुंबई’ यांनी केली आहे. या पार्श्वभूमीवर नैसर्गिक नाल्यांमध्ये वाढलेले कांदळवन व अनावश्यक वनस्पती काढून टाकण्यासाठी वन विभागाने विशेष परवानगी मिळावी अशी मागणी लोकप्रतिनिधींनी केली.तर वनमंत्र्यांनी स्थळ पाहणी करून कांदळवनांचे नियमानुसार व पर्यावरणाचे भान ठेवून खाडीत स्थलांतर करण्याबाबत तपासणी करण्याचे निर्देश दिले आहेत.

खाड्यांच्या प्रवेशद्वारावर झडपा

अनेकदा पावसाळ्यात समुद्रात भरती येते. या भरतीचे पाणी खाडी मार्गाने शहरात घुसते. त्यातच मोठ्या प्रमाणात पाऊस सुरू असेल तर खाडी मार्गाने पाण्याचा निचरा होण्यास अडथळे निर्माण होतात. यामुळे नागरिकांचे प्रचंड प्रमाणात हाल होत आहे. यासाठी आता खाडीच्या प्रवेशद्वारावर झडपा बसविण्यात याव्यात अशा सूचना ही मंत्र्यांनी केल्या आहे. महापालिकेकडून त्यासाठी आराखडा तयार करण्याचे काम सुरू करण्यात आले असल्याचे पालिका अधिकाऱ्यांनी सांगितले आहे.

कांदळवन उद्यान तयार होणार

कांदळवनांच्या विविध प्रजातींचे संवर्धन व्हावे त्याची माहिती नागरिकांना ही मिळावी, याशिवाय पर्यटनाच्या दृष्टीने ही वसई विरार शहराचा विकास व्हावा यासाठी नालासोपारा व वसई मतदारसंघात स्वतंत्र मँग्रोव्ह पार्क उभारण्याबाबत प्रस्ताव तयार करावा, अशा सूचनाही मंत्री गणेश नाईक यांनी दिल्या आहेत.